पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये विज्ञान प्रयोगशाळेसाठी ४.५० कोटी, क्रीडा विकासासाठी १६ कोटी, क वर्ग पर्यटनस्थळ व तीर्थक्षेत्र विकासासाठी ३.१० कोटी निधी देण्यात आला आहे, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
राज्यातील गड व किल्ले, मंदिरे व महत्वाची संरक्षित स्मारके आदींचे संवर्धन करण्याच्या योजनेअंतर्गत ४१ कोटी ९३ लाख रुपये प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने सिंहगड, राजगड, तोरणा, चाकण, पुरंदर किल्ला, रायरेश्वर मंदिर, वाफगाव येथील होळकर वाडा या ऐतिहासिक वास्तूंचा समावेश करण्यात आला आहे.