श्रीकांत देशमुख : बेडरूममधील व्हायरल व्हीडिओनंतर भाजप नेत्याचा राजीनामा, काय आहे संपूर्ण प्रकरण?
बुधवार, 13 जुलै 2022 (19:38 IST)
फोटो साभार- fecebook बेडरूम मधील एक क्लिप व्हायरल झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
श्रीकांत देशमुख असं या भाजप नेत्याचं नाव असून त्यांनी 2009, 2014 साली सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती.
देशमुख यांचं प्रकरण समोर आल्यानंतर साहजिकच राजकीय वर्तुळात तसंच सोशल मीडियावर खळबळ उडाली. विरोधकांकडून टीकास्त्र सोडले जात असताना बॅकफूटवर आलेल्या भाजपने अखेर देशमुखांचा राजीनामा घेऊन आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.
काय आहे प्रकरण?
एका महिलेने बेडरूममध्ये मोबाईल हातात पकडून शूट केलेला हा 24 सेकंदांचा व्हीडिओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. हे प्रकरण विवाहबाह्य संबंधांच्या अवतीभवती असल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येतं.
हा व्हीडिओ शूट करणारी महिला बोलता-बोलता हमसून हमसून रडताना दिसते. ती म्हणते, "हा जो माणूस आहे. हा श्रीकांत देशमुख. याने मला फसवलंय. हा बायकोशी संबंध ठेवून माझ्याशीही संबंध ठेवतोय. लग्न करतोय."
दरम्यान, व्हीडिओ शूट होत असताना श्रीकांत देशमुख हे पांढरा बनियन आणि पांढरी विजार परिधान करून पलंगावर बसलेले असतात. सुरुवातीला महिला नेमकं काय करत आहे, याची कल्पना नसलेले देशमुख कॅमेऱ्याकडे पाहतात. महिलेने आरोपांच्या फैऱ्या झाडणं चालू केल्यानंतर बेडवरून उठतात. नंतर धक्काबुक्की होऊन व्हीडिओ बंद होतो.
धक्काबुक्की सुरू असताना महिला म्हणत असते, "नाही, सोड. तू आता बघच, तू माझ्याशी का खोटं बोललास?" यावर देशमुख उत्तरतात, "असं नाही."
केवळ हाच व्हीडिओ नव्हे तर श्रीकांत देशमुख आणि पीडित महिला यांचं कथित संभाषण असलेली एक ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही ऑडिओ क्लिप तब्बल 18 मिनिटांची आहे.
"आधी लग्न झालेलं असतानाही फसवून माझ्याशी लग्न केलं. तू पहिल्या बायकोपासून घटस्फोट का घेत नाहीस, असा सवाल यामध्ये महिला विचारते. संबंधित पुरुषाला श्रीकांत देशमुख संबोधून बोलताना महिला म्हणते, ""तुझा सुखी संसार होता, तर मग माझ्याशी लग्न का केलंस? मला अर्धी-अधुरी का ठेवलंस, माझं आयुष्य का उद्ध्वस्त केलंस?"
"बाळासाठी मी तुमच्यावर प्रेम केलं. लग्न केलं. तीन वर्षे सोबत राहिले. तरीही मलाच बदनाम केलं जात आहे," असं महिला या क्लिपमध्ये म्हणते.
या क्लिपमध्ये संबंधित महिला देशमुख यांच्याशी भांडण आणि शिवीगाळही करते. तसंच "तुला आमदार व्हायचं होतं ना. देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी या विषयावर बोलणार आहे. बघ आता मी काय करते, तुला कधीच आमदार होऊ देणार नाही," अशा स्वरुपाची धमकीही महिला या ऑडिओ क्लिपमध्ये देते.
बीबीसीने या व्हीडिओची स्वतंत्रपणे पुष्टी केलेली नाही. प्रसारमाध्यमांमधील बातम्यांनुसार, महिलेच्या व्हीडिओ क्लिपला उत्तर म्हणून ही ऑडिओ क्लिप देशमुख यांच्याकडून व्हायरल करण्यात आली आहे.
आरोप फेटाळत देशमुखांचा राजीनामा
हे प्रकरण समोर आल्यानंतर श्रीकांत देशमुख यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा भाजप प्रदेशाध्यक्षांकडे पाठवून दिला. पण त्याचवेळी त्यांनी आपल्यावरील सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.
श्रीकांत देशमुख यांनी चंद्रकांत पाटील यांना पाठवून दिलेल्या पत्रात म्हटलं, "या महिलेने ग्रीन टीमध्ये औषध घालून माझ्याबरोबर आक्षेपार्ह व्हीडिओ बनवला. त्यानंतर माझ्या चारित्र्य हननाचा प्रयत्न केला. या प्रकरणात राजकीय विरोधकांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. तसेच संबंधित महिलेविरुद्ध मी ओशिवरा अंधेरी पोलीस ठाण्यात हनी ट्रॅपिंग आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
'हनी ट्रॅपप्रकरणी तक्रार दाखल केली होती'
माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी 6 जुलै रोजी मुंबईत संबंधित महिलेविरुद्ध हनी ट्रॅपमध्ये अडकवून रक्कम उकळल्याची तक्रार दिली होती.
"मुंबईच्या ओशिवरा-जोगेश्वरी परिसरात राहणाऱ्या महिलेने 1 लाख 78 हजार रुपये फोन पे द्वारे तर 2 लाख रुपये रोख स्वरुपात स्वीकारले. नंतर दोन कोटी रुपये आणि मुंबईत नवीन घर अशी खंडणी मागितली. अन्यथा राजकीय व सामाजिक स्तरावर बदनामी करण्याची धमकी दिली, अशा आशयाची ही तक्रार आहे.
यासंदर्भात श्रीकांत देशमुख यांची बाजू जाणून घेण्याकरता बीबीसी मराठीने त्यांच्याशी संपर्क केला. पण संपर्क होऊ शकला नाही.
भाजप नेत्यांकडून प्रतिक्रिया
श्रीकांत देशमुख यांचं प्रकरण समोर आल्यानंतर भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी तातडीने त्यावर प्रतिक्रिया दिली.
गेल्या दोन वर्षांत महिलांविषयक प्रकरणामध्ये चित्रा वाघ यांनी शिवसेना तसंच राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांवर जोरदार निशाणा साधला होता. या पार्श्वभूमीवर भाजपमधूनच अशा प्रकारचं प्रकरण समोर आल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया काय आहे, याकडे सर्वांचं लक्ष होतं.
देशमुख प्रकरणावर ट्विट करून चित्रा वाघ म्हणाल्या, "भाजपा सोलापूर (ग्रामीण) माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख याच्या संदर्भातला व्हीडिओ समोर आलाय यातील जी संबंधीत ताई आहे तिने तात्काळ पोलिसात तक्रार द्यावी योग्य कारवाई होईलंच.
शिवाय, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तत्काळ दखल देत त्यांना पदावरून मुक्त केलं आहे, असंही वाघ यांनी यावेळी सांगितलं.
श्रीकांत देशमुख कोण आहेत?
श्रीकांत देशमुख हे सोलापूर जिल्ह्यातील भाजप नेते आहेत. राजीनामा देण्यापूर्वी ते भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
दोन वर्षांपूर्वी त्यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती.
सांगोल्यात कुस्तीचे फड आयोजित करण्याच्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेहमी पुढाकार असतो. तसंच आंदोलकांना जशास तसं उत्तर देऊन त्यांना हुसकावून लावण्याच्या स्टाईलमुळे श्रीकांत देशमुख यांची चर्चा होत असते.
श्रीकांत देशमुख यांनी भाजपपूर्वी काँग्रेस आणि जनसुराज्य पक्षातही काम केलं आहे. 2004 मध्ये ते सर्वप्रथम जिल्हा परिषद सदस्य बनले. 2009 ला त्यांनी जनसुराज्य पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली आणि पराभूत झाले. निवडणुकीत श्रीकांत देशमुख यांच्यावर गोळीबाराची घटना घडल्याचा दावा त्यांनी केला होता. पण पोलीस तपासात हा एक बनाव असल्याचं समोर आल्यानंतर ते अडचणीत आले होते.
मतदारांमध्ये सहानुभूती मिळवण्यासाठी देशमुख यांनीच गोळीबाराचा बनाव रचल्याचं पोलीस तपासात समोर आल्याचं तत्कालीन पोलीस अधीक्षक राजेश प्रधान यांनी सांगितलं. त्यावेळी या प्रकरणात देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्यांना अटकही झाली होती.
2014 साली देशमुख यांनी विधानसभेची निवडणूक भारतीय जनता पक्षाकडून लढवली. यातही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.