राहुल नार्वेकर : शिवसेनेचे वकील ते 'शिंदे' सरकारचे विधानसभा अध्यक्ष, असा आहे राजकीय प्रवास...

रविवार, 3 जुलै 2022 (13:43 IST)
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झाल्यानंतर राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदावर निवड झाली आहे.तर महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांचा पराभव झाला आहे.
 
राहुल नार्वेकरांना 164 मतं, तर राजन साळवींना 107 मतं मिळाली. हिंतेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनं भाजप-शिंदे गटाला मत दिलं. समाजवादी पक्ष आणि एमआयएमचे आमदार तटस्थ राहिले.
 
नवं सरकार स्थापन झालं त्यावेळी विधानसभा अध्यक्ष कोण असतील, याची सर्वांना उत्सुकता होती.
 
साधारणपणे विधानसभा अध्यक्षपद हे सत्ताधारी पक्षातील सर्वांत ज्येष्ठ आणि अनुभवी सदस्याला देण्यात येतं. पण शिंदे सरकारने उमेदवारी जाहीर करताना राहुल नार्वेकरांचं नाव पुढे आणलं. त्यांच्या नावावर सुरुवातीपासूनच आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ते आतापर्यंतचे सर्वांत तरूण विधानसभा अध्यक्ष आहेत.
 
या निमित्ताने राहुल नार्वेकर कोण आहेत, त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे, याविषयी आपण माहिती घेऊ -
 
शिवसेनेचे वकील ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते
45 वर्षीय राहुल नार्वेकर हे पेशाने वकील आहेत. त्यांनी अनेक शैक्षणिक, सामाजिक आणि सहकारी संस्थांसाठी वकील म्हणून बाजू मांडण्याचं काम केलं.
 
अनेक संस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणून ते काम करायचे. मुंबई महापालिका तसंच इतर विषयांच्या संदर्भात दाखल याचिकेवर शिवसेनेची बाजू मांडण्याचं काम राहुल नार्वेकर करत असत. पुढे राहुल नार्वेकर यांना शिवसेनेचे प्रवक्ते म्हणूनही इंग्रजी टीव्ही चॅनलवर पाठवलं जाऊ लागलं.
 
राहुल नार्वेकर यांच्याबाबत बोलताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले, "राहुल नार्वेकर आज भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार असले तरी ते सर्वप्रथम एक शिवसैनिक होते."
 
राहुल नार्वेकर यांचे वडील मुंबई महानगरपालिकेत अपक्ष म्हणून निवडून येत असत. त्यांचे भाऊ मकरंद आणि वहिनी हर्षिता या सध्या मुंबई महापालिकेत भाजपचे नगरसेवक म्हणून काम करत आहेत.
 
लोकसभा निवडणुकीत पराभूत
राहुल नार्वेकर यांनी 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पण 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर पाठवलं गेलं.
 
भाजपकडून विधानसभेत
पुढे 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी भाजपतर्फे कुलाबा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. शिवाय भाजपकडून त्यांना मीडिया इंचार्ज पदाची जबाबदारीही देण्यात आली होती. अशा प्रकारे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसनंतर भाजपमध्ये ते स्थिरावले आहेत.
 
नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अभिनंदन करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं, "राहुल नार्वेकर हे स्वतः कायद्याचे उत्तम जाणकार आहेत. आधी ते शिवसेनेत होते,आता भाजप मध्ये आहेत, त्याआधी ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्येही होते. त्यामुळे या सर्व पक्षांना अभिप्रेत असलेल्या भूमिकांची त्यांना उत्तम जाण आहे."
 
"पक्षाची हीच भूमिका प्रवक्ते म्हणून मांडताना त्यांनी वेळोवेळी आपल्यातील हे गुण दाखवून दिलेले आहेत. त्यामुळे कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता ते सदनातील सर्व सदस्यांना निश्चितच समान न्याय देण्याचा प्रयत्न करतील," अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
 
सर्वांत तरूण विधानसभा अध्यक्ष
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "राहुल नार्वेकर हे आज महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वांत तरूण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. तरुण सहकारी म्हणून विधान परिषद तसंच विधानसभेच्या सभागृहात त्यांनी अतिशय चांगलं काम केलं होतं. कायद्यात निष्णात असलेले अध्यक्ष राज्याला मिळाले आहेत."
 
सासरे-जावई सभापती
विधान परिषदेत रामराजे नाईक-निंबाळकर हे सभापती आहेत. योगायोग म्हणजे त्यांच्याशी राहुल नार्वेकर यांचे नातेसंबंध आहेत.
 
रामराजे नाईक हे राहुल नार्वेकर सासरे असून या निमित्ताने सासरे-जावई हे वरीष्ठ-कनिष्ठ सभागृहात सभापती-अध्यक्षपदावर असण्याचा दुर्मिळ योग जुळून आला आहे.
 
"पु. ल. देशपांडे म्हणतात, सासरा आणि जावयाचं कधीच एकमत होऊ शकत नाही. जावई हा सासर्‍याच्या पत्रिकेतला दशग्रह आहे. पण राहुल नार्वेकर आणि रामराजे नाईक निंबाळकर यांचं नातं अतिशय चांगलं आहे," असं फडणवीस यांनी म्हटलं.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती