शिवसेनेकडून केंद्रीय पातळीवर भाजपविरोधात लॉबी तयार करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यातील भेट ही त्यानिमित्तानेच होणार असल्याचे कळते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी के चंद्रशेखर राव यांना फोन करून येत्या २० फेब्रुवारीला मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले आहे. शिवसेनेचा राष्ट्रीय स्तरावर मोट बांधण्याच्या अनुषंगानेच हा प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा यानिमित्ताने आता सुरू झाली आहे.
राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतरच दुसऱ्यांदा भाजपविरोधात आता मुख्यमंत्रीही सक्रीय झाल्याचे दिसते आहे. त्याचाच भाग म्हणजे उद्धव ठाकरेंनी केसीआर यांना केलेला फोन हे समजले जात आहे. या फोनकॉलचे अनेक अर्थ काढण्यात येत आहेत. केसीआर यांच्याकडून मोदी सरकारविरोधात आंदोलन पुकारण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे या नव्या राजकीय समीकरणाला दिशा मिळणार का ? असाही अर्थ यानिमित्ताने लावला जात आहे.