त्यादरम्यान, शिवसेनेच्या गुडांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप सोमय्या यांनी केलं आहे. तर सोमय्या यांनीच शिवसैनिकांवर गाडी घातल्याचा आरोप शिवसेना नेते आणि माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे.
सोमय्या यांनी याप्रकरणाची माहिती देताना ट्विट करत म्हटलं, "पोलिसांनी सीएम उद्धव ठाकरेंच्या गुंडांना पोलीस स्टेशनबाहेर जमू दिलं. मी बाहेर आल्यावर त्या गुंडांनी माझ्यावर दगडफेक केली. गाडीच्या काचा फोडल्या. यात मी जखमी झालो असून पोलिसांच्या उपस्थितीतचं मला मारहाण केली."
"खार पोलिस स्टेशनच्या आवारात 50 पोलिसांच्या उपस्थितीत, शिवसेनेच्या 100 गुंडांनी माझ्यावर दगडफेक केली, मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा माझ्यासाठी मोठा धक्का आहे. पोलिस आयुक्त काय करत आहेत? एवढ्या माफिया सेना गुंडांना पोलीस ठाण्यात कसं जमू दिलं?," असा सवालही सोमय्या यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले, "मुंबई पोलिसांनी माझी एफआयआर नोंदवण्यास नकार दिलाय. 70/80 शिवसेनेच्या गुंडांनी मला मारण्याचा प्रयत्न केलाय आणि ठाकरे सरकारने कोणतीही कारवाई करण्यास किंवा माझा एफआयआर नोंदवण्यास नकार दिलाय."
दरम्यान, सोमय्या यांनी शिवसैनिकांवर गाडी घातल्याचा आरोप शिवसेना नेते आणि माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे. शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर हल्ला केला नसल्याचं ही ते म्हणाले. महाडेश्वर यांनी किरीट सोमय्याविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलीस योग्य ती कारवाई करतील - गृहमंत्री
किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी बोलताना महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं, "दगडफेक झाली हे खरंय पण कोणाकडून झाली का झाली हा तपासाचा भाग आहे. पोलीस योग्य ती कारवाई करतील. "पोलिसांना वेगळे आदेश देण्याची गरज नाही, त्यांना आपलं काम समजतं आणि त्याप्रमाणे त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं."