शिर्डीत येणा-या भाविकांच्या सुरक्षेसाठी स्थानिक प्रशासनाने रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत शहरातील हॉटेल व्यवसाय बंद करण्याचा निर्णय मागील काळात घेतला होता. परंतु, साईभक्तांची गैरसुविधा टाळण्यासाठी रात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत हा निर्णय लागू करावा, अशी मागणी शिर्डीतील हॉटेल व्यावसायिकांनी शासनाच्या लोकप्रतिनिधींकडे केली होती. परराज्यातून येणा-या भाविकांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे भाविकांना अनेक संकटांना तोंड देऊन उपाशीपोटी रहावे लागत होते. सदरची अडचण लक्षात घेऊन गृह विभागाचे कक्ष अधिकारी शशांक सावंत यांनी नव्याने परिपत्रक काढले आहे. हॉटेल आस्थापनासाठी राज्य शासनाने मार्गदर्शक तत्त्व आणि वेळेची नियमावली काढली आहे. त्यानुसार शिर्डीत रात्री साडेअकरा वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी दिली असून, यामध्ये फक्त खाद्यपदार्थ पुरविण्याची अट परवानगी टाकण्यात आली आहे. पुढील एक तास आवरासावर करण्यासाठी दिला असल्याचे पत्रकात नमूद केले आहे. रात्री साडेबारापर्यंत हॉटेल बंद करण्यात यावे, असा अध्यादेश जारी केला आहे. या निर्णयामुळे शिर्डीतील हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.