'तिने 3 गाणी वाजवून 3 लाख घेतले, आम्ही 5 हजार जास्त मागितले, तर इंदुरीकर महाराजांची गौतमी पाटीलवर टीका

रविवार, 26 मार्च 2023 (10:50 IST)
आपल्या वक्तव्यांनी सतत चर्चेत राहणारे कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. बीडमधील आष्टी तालुक्यातील तवलवाडी या गावात इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

“तिने 3 गाणी वाजवून 3 लाख रुपये घेतले आणि आम्ही 3 हजार रुपये जास्त मागितले, तर लोक म्हणतात काय खरंय याचं,” असं इंदुरीकर महाराजांनी म्हटलं आहे. ते बीडमध्ये आयोजित कीर्तनात बोलत होते. 
 
यावेळी बोलताना इंदुरीकर महाराज म्हणाले की, “तिने (गौतमी पाटीलने) 3 गाणी वाजवली आणि 3 लाख रुपये घेतले. तिच्या कार्यक्रमात मारामारी झाली, काहींचे गुडघेही फुटले, पण तिच्याविषयी काही बोललं जात नाही आणि आम्ही 5 हजार जास्त मागितले तर लोक म्हणतात की काय खरंय त्याचं, सगळी जनता लुटली असे म्हणतात.”
ज्या भागात इंदुरीकर महाराज कीर्तन करत होते, त्याच परिसरात काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
 
त्या कार्यक्रमामध्येही प्रेक्षकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. लोकांची धावपळ उडाली होती. या घटनेत काही लोक जखमी देखील झाले होते. गौतमी पाटील हिच्यावर अप्रत्यक्षपणे भाष्य करताना इंदुरीकर महाराजांनी या घटनेचा संदर्भ दिला.

Edited By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती