महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. या पार्श्वभुमीवर राजकीय पक्षाने आपली कंबर कसली आहे. तर या निवडणुकीसाठी कोल्हापूरहून भाजपकडून (BJP) माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नूषा व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शौमिका महाडिक यांचं नांव निश्चित करण्यात आलंय. 13 ऑक्टोबर रोजी यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या नावावर शिकामोर्तब केल्याचे समजते.
विधानपरिषदेच्या सहा जागेचा कालावधी संपुष्टात येत आहे. यासाठी नव्याने 6 जागेवर निवडणूक जाहीर करण्यात आले आहे.तसेच महाविकास आघाडीकडून कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नावावर शिकामोर्तब केला आहे.दरम्यान भाजपकडून उमेदवार कोण? याची उत्सुकता शिगेला पोहचली होती.त्यातच दोन दिवसापुर्वी चंद्रकांत पाटील यांनी शौमिका महाडिक यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे , माजी आमदार सुरेश हाळवणकर प्रा. जयंत पाटील , भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या नावाची चर्चा होती.
दरम्यान, उमेदवारीसाठी राहुल आवाडे हेही आग्रही आहेत.आमदार आवाडे यांनीही आपल्या कुटुंबात उमेदवारी दिल्यास ताकदीने लढण्याची ग्वाही भाजपच्या नेतृत्त्वाला दिलीय.त्यामुळे आवाडे की महाडिक याविषयीची उत्सुकता संपुष्टात येण्याची शक्यता आहे.तर, चंद्रकांत पाटील यांनी शिरोली येथे माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेतली.या भेटीनंतरच सौ. शौमिका महाडिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते.दरम्यान याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.मात्र, त्याचं नांव निश्चित असल्याची चर्चा आहे.