मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीत परिवर्तनाचे वारे सुरू होण्याची चिन्हे आहे. आता पक्षातील महत्त्वाच्या पदांवर कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सध्या जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहे. यापूर्वी जयंत पाटील यांच्या राजीनाम्याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू होत्या. मिळालेल्या माहितीनुसार 8 जानेवारीला सर्व आमदार, खासदार आणि विभागप्रमुखांची बैठक होणार आहे. जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांनाही 9 जानेवारीच्या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. या दोन दिवसीय बैठकीत शरद पवार आपल्या पक्षातील बदलांबाबत सर्वांची मते घेणार असून त्यानंतर विविध पदांवरील प्रमुख बदलले जाणार आहेत. या बैठकीला शरद पवार स्वत: उपस्थित राहणार असून काही मोठा निर्णय घेऊ शकतात.
राष्ट्रवादीचे (अजित गट) वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी सांगितले की, राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले तर मला खूप आनंद होईल. यावरून राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. यापूर्वी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार आणि आमदार रोहित पवार यांची दिल्लीत भेट झाली होती.