शेती व्यवसाय घटक मानून आरक्षण दिल्यास मराठा समाजासह सर्व समाजातील मागासांना आरक्षणाचा लाभ घेता येईल, अशी नवी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात घेतलेल्या मुलाखतीतील आरक्षणासंदर्भातील आपले विधान नीट समजून घेतले गेले नाही, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसींसाठी असलेल्या आरक्षणाला धक्का न लावता आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची भूमिका मी मांडली होती. आघाडी सरकारच्या काळात मराठा व मुस्लिम समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयाने रद्द ठरविल्यामुळे आर्थिक निकषाच्या आधारे आरक्षणाचा विचार पुढे आला.
शेजारील कर्नाटक राज्यात मराठा समाज ओबीसीमध्ये येतो. राजस्थानात जाट समाजाला आरक्षण देण्यात येते. या राज्यांनी मराठा समाजाची व्याख्या व्यापक केल्याने न्यायालयाच्या कसोटीवर आरक्षण टिकले. असाच प्रयत्न महाराष्ट्रानेही करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली.