पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीवेळी राष्ट्रपती भवनात पाचव्या रांगेत बसण्याचा पास मिळाल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शपथविधी सोहळ्याला गेले नाहीत. यावर राष्ट्रपती भवनाकडून खुलासा करण्यात आला आहे. यात वरिष्ठ नेत्यांची व्हीव्हीआयपी रांगेत बसण्याची व्यवस्था केली होती. पवार यांची बसण्याची जागा पहिल्या रांगेत म्हणजे व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या ठिकाणी होती, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे माध्यम सचिव अशोक मलिक यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.
याआधी शपथविधी सोहळ्यासाठी शरद पवार यांना व्ही सेक्शनमध्ये बसण्यासाठी आमंत्रित केले होते. या ठिकाणी अतिवरिष्ठ आमंत्रितांना बसण्याची व्यवस्था होती. मात्र व्ही म्हणजे (व्हीव्हीआयपी) हे रोमनमधील व्ही (५) असे समजून राष्ट्रपती कार्यालयातील कोणाचातरी गोंधळ झाला असावा, असे मलिक यांनी नमूद केले आहे. शरद पवार यांना शपथविधी सोहळ्यावेळी बसण्यासाठी योग्य जागा दिली नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी नाराजी व्यक्त केली होती.