भाजपला पर्याय म्हणून काँग्रेसने महत्त्वाची भूमिका निभावली - शरद पवार

गुरूवार, 13 डिसेंबर 2018 (08:59 IST)
विधानसभा निवडणुकांचे जे निकाल आले आहेत, त्याबद्दल भाजपा सोडून इतर पक्षांमध्ये समाधान आहे. काँग्रेसला अनुकूल अशी भूमिका घेण्याचे आमचे सूत्र होते. भाजपला पर्याय म्हणून काँग्रेसने महत्त्वाची भूमिका निभावली. हा निकाल पाहता लोकांनी साडेचार वर्षांचा केंद्राचा कारभार, त्यांनी घेतलेले निर्णय, नोटबंदी, अर्थव्यवस्थेबाबत उदासीनता, स्वायत्त संस्थांवर हल्ले आणि त्यांचा आक्रमक प्रचार याबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे.
 
मधल्या काळात चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन नियुक्त्यांबद्दल प्रतिक्रिया दिली होती. आरबीआयच्या गव्हर्नरांनी राजीनामा दिला आहे. सीबीआयमधील वादही समोर आला. या सर्व गोष्टींमुळे देशातील महत्त्वाच्या संस्थांचे भवितव्यच धोक्यात आले आहे. यासंदर्भात मर्यादा पाळल्या गेल्या नाहीत. पंतप्रधानांनी जी आश्वासनं दिली होती ते सर्व मुद्दे या निवडणुकांमध्ये विसरले गेले. विकासांच्या मुद्द्यावर भाष्य न करता वैयक्तिक हल्ले करण्यावर त्यांचा भर होता. आजच्या नव्या पिढीने पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांना पाहिलेलं नाही. पण मोदी गेल्या १० वर्षांतील देशातील घडामोडींबाबत न बोलता फक्त त्या कुटुंबावर हल्ला करत राहिले. मात्र त्यांनी संविधानावर हल्ला केला, एका कुटुंबावरच हल्ला केला. एकूणच पंतप्रधानपदाची गरिमा मोदी यांच्याकडून प्रचारादरम्यान पाळली गेली नाही. याबद्दल लोकांनी नाराजी व्यक्त केली आणि त्याची ही परिणिती आहे.
 
आमचा अंदाज होता की, शेतकरी, आदिवासी या मतदारांचा फटका भाजपला बसेल, पण भाजपाला शहरी भागात ही ५० टक्के मतांचा फटका बसला आहे. याचा अर्थ समाजाच्या सर्वच वर्गांमध्ये या सरकारविरोधात नाराजी दिसते. ही परिवर्तनाची सुरुवात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती