बिबट्याशी झुंज देऊन ३ शाळकरी मित्रांचे वाचवले जीव

रविवार, 28 जानेवारी 2024 (10:26 IST)
इगतपुरी तालुक्यातील धार्णोली येथे बिबट्याने विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
बिबट्याशी झुंज देणारा योगेश रामचंद्र पथवे हा दहावीत शिकणारा विद्यार्थी आहे. योगेश शाळकरी मित्र प्रविण, निलेश, सुरेश यांच्यासह घरातून शाळेच्या दिशेने जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. समयसूचकता दाखवत योगेशने प्राणाची पर्वा न करता प्रसंगावधान राखत मित्रांना बाजूला ढकलले.
 
बिबट्याशी कडवी झुंज देत त्याचा हल्ला परतवून लावला. मात्र या घटनेत योगेश जखमी झाला. वारंवार प्रतिकारासह अन्य मित्रांनी आरडा ओरड केल्याने बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. जखमी योगेशला मित्रांनी पुढील उपचारासाठी घोटी येथील खासगी दवाखान्यात दाखल केले आहे.
 
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सामाजिक कार्यकर्ते सिताराम गावंडा यांनी ह्या परिसरात पिंजरा लावण्याची व बिबट्याचा बंदोबस्त करावा, जखमी विद्यार्थ्याला आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. धाडशी योगेशचे इगतपुरी तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती