संयोगिताराजे काळाराम मंदिर प्रकरण: कोल्हापुरात संभाजीराजे आक्रमक

शनिवार, 1 एप्रिल 2023 (21:37 IST)
संयोगिताराजे छत्रपती यांना नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये रामनवमीला वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी मज्जाव केला. यानंतर संयोगिताराजे यांनी महंतांना खडेबोल सुनावले शिवाय सोशल मिडियावर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली. यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात यावर चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी आज कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधत पगारी पुजारी नेमण्याची मागणी केली. यावेळी लोकसभेला स्वतंत्र जाण्याचा निर्णय पक्का असल्याचेही स्पष्ट केले.
 
यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, संयोगिता राजे या माझ्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये गेल्या होत्या. त्या नेहमी सत्य आणि परखड बोलतात. त्यांनी सोशल मीडियात भावना व्यक्त केल्या. त्यांच्या परखड पणाचा मला सार्थ अभिमान आहे. संताच्या विचाराने चालणारा महाराष्ट्र आहे. सामान्यांना देखील तिथे पूजा करण्याचा अधिकार आहे. या घटना पुन्हा घडू नये असा सल्ला अप्रवृत आणि अकृत्य करणाऱ्या लोकांना दिला.
 
संभाजीराजे यांचा वाढदिवस होवून दिड महिना झाल्यानंतर आता हा मुद्दा का उपस्थित केला जातोय असा प्रश्न विचारल्यावर संभाजीराजे म्हणाले की, दिड महिन्यांनी बोलल्या म्हणजे माझ्या वाढदिवसादिवशी बोलून वातावरण गढूळ करायचे नव्हते. त्यांनी अप्रवृतपणा थांबवण्यासाठी पाऊल उचलले आहे. मी संयोगिताराजे यांचेबद्दल नाट्य करू शकत नाही.मंदिरात अप्रवृत्ती आजही आहे. हे बदलणे गरजेचे आहे.अप्रवृत लोकांनी स्वतःच चिंतन करावे. ज्या महतांनी बोलले त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत,त्यांची चौकशी करावी. सामान्य माणसाला पूजा करण्याचा अधिकार आहे त्यामुळं अकृत्य करणारी प्रथा बंद झाली पाहिजे.सरकारने या गोष्टीत लक्ष घालावे.अशा घटना का घडतायेत याचा शोध घ्यावा अशी मागणी करत त्याबद्दल मला आणखी बोलायला लावू नका असा म्हणत संताप व्यक्त केला.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती