संजय राऊत म्हणतात, औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणाऱ्यांसोबत युती शक्य नाही
शनिवार, 19 मार्च 2022 (14:51 IST)
आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी करण्याची ऑफर एमआयएमनं दिली पण 'औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणाऱ्यांसोबत कोणत्याही प्रकारची युती शक्य नाही' असं म्हणत शिवसेनेने ही ऑफर धुडकावून लावली आहे.
इम्तियाज जलील यांच्या घरी सांत्वन भेटीसाठी गेलेल्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यामध्ये चर्चा झाली. यात आपला निरोप पवारांपर्यंत पोहोचवण्याची विनंती जलील यांनी केली होती.
"भाजपला हरवायचं असल्यास सर्वांनी एकत्र यायला हवं. केवळ राष्ट्रवादीच नाही तर काँग्रेस सोबत देखील जायला तयार आहोत. त्यामुळे ही बाब राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी गंभीरतेनं घ्यावी. राजेश टोपे यांनी पवार त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचवावा. औरंगाबाद महानगरपालिका असं नाही तर राज्यातही युती करायला तयार आहोत," असं वक्तव्य खासदार इम्तियाज जलील यांनी केलं होतं. शिवसेनेसोबतही आघाडीची एमआयएमची तयारी असल्याचं बोललं जातंय.
आता एमआयएमची ही ऑफर महाविकास आघाडी स्वीकारणार का? विशेषतः शिवसेना काय भूमिका घेणार याकडे राजकीय पंडितांचं लक्ष लागून होतं. यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले, "शिवाजी महाराज, संभाजी महाराज आमचे दैवत आहेत, त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणाऱ्यांसोबत कोणत्याही प्रकारची युती शक्य नाही. एमआयएम आणि बीजेपीची छुपी युती आहे, तुम्ही युपीमध्ये पाहिलेलं आहे. बंगालमध्येही पाहिल आहे. त्यामुळे बीजेपी बरोबर छुपी युती असणाऱ्यासोबत महाविकास आघाडी मधला कोणताही पक्ष युती करणार नाही."
राज्यात तीन पक्षांचं सरकार असून त्यामध्ये चौथा पक्ष येणार नसल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. MIM ही भाजपची बी टीम आहे, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये हे दिसून आल्याचं राऊत म्हणाले आहेत.
तर शिवसेना राजकारणासाठी शिवाजी महाराजांचा वापर करत असल्याची प्रतिक्रिया MIMचे नेते इम्तियाज जलील यांनीदिली आहे.
"भाजपच्या पराभवात MIMला रस असेल तर त्यांनी कृतीतून दाखवावं, धार्मिक तेढ वाढेल अशी वक्तव्य टाळावीत," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय. MIM हा समविचारी पक्ष आहे का हे तपासावं लागेल असंही पाटील म्हणाले आहेत. समविचारी पक्षांनी एकत्र येणं चांगलं असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं होतं.
"MIM भाजपची बी टीम नसेल तर त्यांचा औरंगाबाद महापालिकेत काय रोल आहे?" असा सवालही जयंत पाटील यांनी केलाय.
तर इम्तियाज जलील यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आता शिवसेना सत्तेसाठी काय करते, हे आम्हाला पाहायचे आहे. शिवसेने आधीच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेले आहे. अजानची स्पर्धा ते घेऊ लागले आहेत. MIM सोबत युती हे त्याचा परिणाम आहे का पाहू."
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, "काही हरकत नाही, ते सर्व एकत्रित आले तर, शेवटी ते सर्व एकच आहेत. भाजपला अडवण्यासाठी, पराभूत करण्यासाठी सर्व एकत्रित देण्याचा प्रयत्न करत आहेत.. मात्र सर्व एकत्रित आले तरी महाराष्ट्रातली जनता मोदींवर विश्वास ठेवणारी आहे.. जनता भाजपलाच निवडून देईल. हे हरले तर यांना ईव्हीएम दिसते. बी टीम, सी टीम, झेड टीम दिसून येते.. हरल्यानंतर या पद्धतीच्या टीका करत असतात."