सातत्याने गैरहजर राहिल्याने खासदार संजय राऊत यांना शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. परंतु, संजय राऊत त्यांनी ताततीडने न्यायालयात हजेरी लावत वॉरंट रद्द करून घेतला आहे. संजय राऊत नुकतेच १०० दिवस तुरुंगात राहून सुटून आले आहेत. त्यामुळे अजामीनपात्र वॉरंट निघताच त्यांनी न्यायालयात धाव घेतली आणि वॉरंट रद्द करून घेतले.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीत सातत्याने गैरहजर राहिल्याने न्यायदंडाधिकारी पी.आय.मोकाशी यांनी संजय राऊत यांना आजीमनपात्र वॉरंट जारी केलं होतं. मुंबई उच्च न्यायालयात एका प्रकरणात सुनावणी सुरू असल्याने शिवडी न्यायालयात पोहोचणे जमले नाही. वाहतूक कोंडीमुळे वेळेत पोहोचू शकलो नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती. त्यानंतर, ते लागलीच शिवडी न्यायालयात पोहोचले आणि अजामीनपात्र वॉरंट रद्द करून घेतला.