माझ्या मतदानाचा अधिकार संजय राऊतांना द्या, आमदार भुयारांची खोचक टीका

शुक्रवार, 17 जून 2022 (22:16 IST)
विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरूद्ध भाजप यांच्यामध्ये पुन्हा एकदा चुरस होताना पहायला मिळणार आहे. यामुळे अपक्ष आमदारांच्या मतावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे. यातच अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी राज्यसभेवेळी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने याचे खापर अपक्ष आमदारांवर फोडले होते. त्यामुळे माझा मतदानाचा अधिकार राऊतांना द्यावा, असा खोचक टोला आमदार भुयार यांनी लगावला आहे.
 
मी लोकसभा निवडणुकीपासून महाविकास आघाडीसोबत आहे. याची जाणीव मी शरद पवारांपासून सर्वांना करून दिली आहे. यामुळे राज्यसभेवरून आम्हा तीन आमदारांची नावे संजय राऊतांनी घेतली व दगाफटका केल्याचा आरोप केला, यावर माझ्या मतदानाचा अधिकार राऊतांनाच द्यावा, असा खोचक टोला अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी लगावला आहे.
 
विधान परिषदेला गुप्त मतदान घेण्यात येणार आहे. राज्यसभेला आमच्यावर गुप्त होते म्हणूनच आक्षेप घेण्यात आला. विधानपरिषदेलाही आम्ही तुम्हालाच मतदान केले याचे पुरावे देऊ शकणार नाही, छातीठोकपणे सांगू शकणार नाही. यामुळे मी महाविकास आघाडीसमोर दोन पर्याय ठेवणार असल्याचे भुयार म्हणाले.
 
देवेंद्र भुयार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला. त्यानंतर संजय राऊतांनी काही अपक्ष आमदारांची नावे जाहीर केली होती. तसेच काही आमदारांनी पाठिंबा न दिल्यामुळे आणि निवडणुकीत घोडेबाजार केल्यामुळे मविआचा पराभव झाला, अशा प्रकारचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं. त्यामध्ये अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांचेही नाव होते. दरम्यान, माझ्या मताचा अधिकारच संजय राऊतांना देऊन टाका. असं भुयारांनी म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती