सांगली लोकसभा मतदारसंघ : आणीबाणीतही न ढासळलेला वसंतदादांचा गड काँग्रेसने कसा गमावला?
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2024 (10:08 IST)
आणीबाणीनंतर देशभरात काँग्रेसने आपल्या जागा गमावल्या, मात्र अशा अटीतटीच्या परिस्थितीतही गणपतराव गोटखिंडे या काँग्रेसच्या उमेदवाराने आपला मतदारसंघ राखला होता. हा मतदारसंघ म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ.देशात कोणाचीही सत्ता येऊ दे, पण सांगलीमधून नेहमीच काँग्रेसचाच उमेदवार निवडून यायचा.
1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्याची वाटचाल कृषी-औद्योगिक अशी एकत्रितरित्या झाली पाहिजे म्हणून पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तसाच रोडमॅप आखला.
त्यांचा हा दृष्टिकोन ओळखणाऱ्या राज्यातील काँग्रेस नेतृत्वाच्या फळीतील वसंतदादा पाटलांनी सांगली जिल्ह्यात सहकाराचा पाया घातला.
त्यांनी सांगलीत सहकाराचं जाळं विणून जिल्हा कायम काँग्रेसच्या ताब्यात ठेवला होता. म्हणूनच सांगली लोकसभा मतदारसंघावर वसंतदादादांचा वरचष्मा राहिला.
अगदी आणीबाणीनंतरच्या जनता लाटेतही वसंतदादांचा उमेदवारच काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आला.
दादांच्यानंतर त्यांचे सुपुत्र प्रकाशबापू पाटील, पुतणे मदन पाटील, नातू प्रतीक पाटील यांनी अनेक वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व केले.
मात्र, या काँग्रेसच्या मजबूत किल्ल्याला 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने खिंडार पाडलं.
2014 मध्ये मोदी लाटेचा परिणाम; काँग्रेसचा बालेकिल्ला प्रथमच ढासळला
1962 ते 2014 पर्यंत या मतदारसंघातून नेहमी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता.
वसंतदादाचे पुत्र प्रकाशबापू पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचे पाच वेळा नेतृत्व केलं. त्यांच्या निधनानंतर प्रतीक पाटील 2006ला झालेल्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. 2009ला प्रतीक यांनी पुन्हा विजय मिळवला.
पण 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजयकाका पाटील यांनी ऐन लोकसभेवेळी भाजपमध्ये प्रवेश केला.
2014 च्या मोदी लाटेत संजयकाका पाटील यांनी प्रतीक पाटील यांचा पराभव केला आणि पहिल्यांदा काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला.
त्यानंतर काँग्रेस – राष्ट्रवादीने सांगलीमध्ये जिल्हापरिषद, महापालिका, पंचायत समित्या, नगरपरिषदा, महापालिका अशी सत्ताकेंद्रे एकापाठोपाठ एक गमावली.
त्या पाच वर्षांत भाजपच्या सत्तेचा वारू जिल्ह्यात चौफेर उधळला. भाजपने संपूर्ण मतदारसंघात संपर्क वाढवला.
त्यांनी मतदारसंघातील पूर्वाश्रमीचे काँग्रेस - राष्ट्रवादीतील कार्यकर्ते भाजपच्या गाळाला लावले. या कार्यकर्त्यांना बळ देत त्यांनी भाजपचा पाया विस्तारला. त्यामुळे त्यांच्या पक्षांतर्गत उमेदवारीला फारसे आव्हान उभे राहिले नाही. त्यामुळे 2019 ची उमेदवारीही त्यांना सहजपणे मिळाली.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत काय घडलं?
सांगली जिल्ह्यातील मातब्बर नेते आर. आर. पाटील, पतंगराव कदम आणि मदन पाटील अशा ज्येष्ठ नेत्यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं जिल्ह्यातलं छत्रच हरपलं.
2019 च्या निवडणुकीच्या आधी प्रतीक पाटील यांनीही पक्षाचा राजीनामा दिला.
"मी काँग्रेसचा राजीनामा देत आहे. काँग्रेस पक्षाशी माझं नातं संपलं आहे," अशी घोषणा प्रतीक पाटील यांनी सांगलीतील एका मेळाव्यात बोलताना केली होती.
निवडणुकीच्या अगदी दोन महिने आधी काँग्रेसमध्ये लढायलाच कोणी नव्हते अशी स्थिती होती. कदम आणि पाटील घराण्याबाहेरच्या उमेदवाराचा विचारही काँग्रेसने केला नव्हता.
शेवटी आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली. यावेळी स्वाभिमानीने काँग्रेसमधल्याच विशाल पाटलांना आयात करत त्यांना उमेदवारी दिली. विशाल पाटील म्हणजे वसंत दादांचे नातू. त्यांची जिल्ह्यात तशी चांगलीच ताकद आहे.
त्यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीला रंग चढलाच होता, मात्र निवडणूक ऐन रंगात आली ती गोपीचंद पडळकर यांच्या एन्ट्रीने. पडळकर सुरवातीला काँग्रेस - स्वाभिमानीकडून रिंगणात उतरणार होते. मात्र, ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी बहुजन वंचित आघाडीकडून उमेदवारी मिळवली आणि जिल्ह्यात प्रचाराचा धुरळा उठवला.
आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यासाठी घेतलेल्या सांगलीतील सभेत मिळालेला प्रतिसाद पाहता पडळकरांना चांगली मतं मिळणार असा कयास बांधला जात होता.
मात्र, पडळकरांना तिसर्या क्रमांकाची मतं मिळाली आणि याचा फटका बसला आघाडीच्या उमेदवाराला. परिणामी भाजपने हा अटीतटीचा सामना संजय काका पाटलांच्या रूपाने जिंकला.
आगामी लोकसभेचं वारं कोणत्या दिशेने वाहतंय ?
खरं तर यावेळी जिल्ह्यातील राजकीय स्थिती बदलली आहे. राज्यात सत्ताकारणाची समीकरणं बदलल्याचा परिणाम म्हणून महायुतीतील घटक पक्षांची ताकद भाजपच्या उमेदवाराला मिळेल असं प्रत्यक्षदर्शी दिसत असलं तरी परिस्थिती वेगळंच सांगते.
सांगली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये जत, तासगाव - कवठेमहांकाळ, खानापूर - आटपाडी, पलूस - कडेगाव, मिरज आणि सांगलीचा समावेश आहे. सध्या पलूस-कडेगाव आणि जत काँग्रेसकडे, तासगाव राष्ट्रवादीकडे, खानापूर-आटपाडी शिवसेना शिंदे गटाकडे, सांगली व मिरज भाजपकडे आहे.
मात्र यापैकी बर्याच ठिकाणी खासदार संजय पाटील यांच्या विरोधात पक्षाअंतर्गत गटबाजी दिसून आली. मागच्या साडेनऊ वर्षांत खासदारांकडून पक्षासाठी कोणतंही योगदान मिळत नसल्याचा आरोप पक्षातील नेत्यांनीच केला होता. त्यात पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनीही जिल्हाभर जनसंपर्क वाढवून लोकसभेसाठी शड्डू ठोकण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे.
अलीकडेच सांगली मधील भाजप संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी लोकसभेच्या उमेदवारीबद्दल कोणतंही सूतोवाच न केल्याने संजयकाका पाटील यांची धाकधूक वाढलीय.
त्यामुळे सध्या तरी भाजपमध्ये उमेदवारीसाठी विद्यमान खासदार संजयकाका पाटील आणि भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यात तीव्र स्पर्धा असल्याचं दिसतंय. पण कोणा एकाला उमेदवारी दिली तर दुसरा नाराज होऊन या नाराजीचा फटका पक्षाला बसण्याचा शक्यता लक्षात घेऊन भाजपकडून अखेरच्या क्षणी दुसरंच नाव उमेदवारीसाठी पुढं येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
काँग्रेसच्या उमेदवाराबद्दल सांगायचं तर लोकसभेसाठी वसंत दादांचे नातू विशाल पाटील हेच उमेदवार असावेत अशी आग्रही मागणी काही महिन्यांपूर्वी मुंबईत झालेल्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीत करण्यात आली होती. 2019 मध्ये पक्षाचे चिन्ह नसल्याने पराभव पदरी आल्याचं काहींचं म्हणणं होतं.
सध्या जिल्ह्यात काँग्रेसचं नेतृत्व विश्वजित कदम यांच्याकडे आहे, तर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांचीही ताकद मोठी आहे. दुसरीकडे जतमध्ये कॉंग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत, तासगावच्या आमदार शरद पवार गटाच्या सुमनताई पाटील आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ जर काँग्रेससाठी सुटला तर हे सर्व विशाल पाटील यांच्या मागे ताकदीने उभा राहण्याची शक्यता आहे.