पुणे ड्रग्ज प्रकरणात सांगली 'कनेक्शन', कुपवाड एमआयडीसीतून तब्बल 300 कोटींचे ड्रग्ज जब्त

गुरूवार, 22 फेब्रुवारी 2024 (12:27 IST)
पुणे, कुरकुंभ आणि दिल्लीनंतर सांगली जिल्ह्यातून अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. पुणे पोलिसांनी गेल्या तीन दिवसांत केलेल्या कारवाईत आतापर्यंत साडेतीन हजार कोटींचे मेफेड्रोन म्हणजेच एमडी जप्त करण्यात आलंय.
 
पुणे, दिल्ली पाठोपाठ सांगली जिल्ह्यात कुपवाड एमआयडीसी मध्येही 300 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. पुणे पोलिसांनी मंगळवारी (20 फेब्रुवारी) कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कंपनीवर छापा टाकून एक हजार कोटी रुपये किमतीचे 500 किलो आणि विश्रांतवाडीतून 100 कोटी रुपये किमतीचं 50 किलो एमडी जप्त केलं. या शिवाय गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्लीतील कंपनीवर छापा टाकून 800 कोटी रुपये किमतीचं एमडी जप्त केलं. 
 
बुधवारी (21 फेब्रुवारी) सांगलीतून 10 किलो एमडी जप्त करण्यात आलं आहे. याशिवाय अजून 50 किलो एमडीचा शोध सुरू असल्याचं पोलीसांचं म्हणणं आहे. सर्व कारवायांमध्ये एकूण आठ जणांना ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू आहे. देशातील अमली पदार्थ तस्करीतील बडे तस्कर यामध्ये सामील असून त्यांच्या शोधासाठी अमली पदार्थ प्रतिबंधक संचालनालयाच्या (एनसीबी) मदतीने संपूर्ण देशभरात तपास सुरू करण्यात आला आहे.
 
कुपवाड एमआयडीसीतून तब्बल 300 कोटींचे ड्रग्ज जब्त
सांगली जिल्हयातील कुपवाड एमआयडीसी मध्ये तीनशे कोटी रुपये किमतीचे एम डी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे क्राईम ब्रँच पोलिसांनी सांगली पोलिसांच्या सहकार्याने कारवाई केली आहे. आयुब मकानदार आणि अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी कुपवाड एमआयडीसी मध्ये केटामिनवर कारवाई झाली होती त्यानंतर आता तब्बल तीनशे कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्सवर कारवाई झाली आहे.
 
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अवैधरित्या उत्पादन करणाऱ्या एमडी ड्रग्स चा पर्दाफाश केला असून पुणे, दिल्ली पाठोपाठ सांगली जिल्ह्यात असणाऱ्या एमआयडीसी कुपवाड मध्ये काही 300 कोटी रुपयांचा एमडी ड्रगचा साठा जप्त केला आहे. पुण्यातून टेम्पो मधून काही पिशव्या कुपवाड मध्ये आल्याचे माहिती पुणे गुन्हे शाखेला मिळाली होती. आरोपी आयुब माकनदार याने कुपवाड मध्ये रूम भाड्याने घेऊन गोण्या ठेवल्या होत्या.
 
सांगलीतील कुपवाड मधून 140 किमो एम डी ड्रग्स जप्त कण्यात आला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 280 ते 300 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. पुणे शहर, कुरकुंभ, दिल्ली त्यानंतर कुपवाड मध्ये पुणे गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. आयुब मकानदार हा यापूर्वी ड्रग्ज प्रकरणी येरवडा मध्ये शिक्षा भोगत असताना आयुब याची पुण्यात अन्य संशयीतासोबत ओळख झाली. त्यातूनच तो ड्रग्ज पुरवठा करण्याचे काम करत होता.
 
कुपवाड मधील स्वामी मळा मध्ये पुण्यातील क्राईम ब्रँच कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुणे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी कुपवाड येथे येवून कारवाई केली. सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड आणि कुपवाड एम आय डी सी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी संयुक्तिकपणे ही कारवाई केली आहे.
 
कारवाईमध्ये काय आढळलं?
विश्रांतवाडी मधील मिठाचे गोदाम आणि दौंड तालुक्यातील कुरकुंभ मधील औद्योगिक वसाहतीतील अर्थकेम लॅबोरटीज कंपनीवर छापा टाकत पुणे पोलिसांनी मेफ्रेडोनचा साठा जप्त केला. गोदामात मीठ आणि रांगोळीचा साठा करून ठेवण्यात आला होता. पांढऱ्या क्रिस्टलप्रमाणे दिसणारं एमडी छोट्या पाकिटांमध्ये भरून ती पाकिटं मिठाच्या मोठ्या पाकिटांमध्ये लपवली जात होती. भीमाजी ऊर्फ अनिल परशुराम साबळे (वय 45) नामक व्यक्तीच्या नावे असलेल्या कारखान्यावर ही कारवाई करण्यात आली असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे.
 
पोलीस काय म्हणाले?
पुण्याच्या कुरकुंभमध्ये जप्त केलेला कच्चा माल पुण्यातून मीरा-भाईंदर, मुंबई, पश्चिम बंगाल आणि नेपाळमार्गे परदेशात पाठवला जात असल्याची माहिती तपासात मिळाल्याचं पोलीसांनी सांगितलंय. मेफेड्रोनची निर्मिती आणि विक्री प्रकारणाचे धागेदोरे देश-परदेशात पसरले असल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणी काही आंतरराष्ट्रीय आणि भारताबाहेरील मूळ भारतीयांच्या समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. राज्याबाहेरील कारवायांसाठी गरज पडल्यास केंद्रातील यंत्रणांची मदत घेतली जाईल, असंही अमितेश कुमार यांनी सांगितलं.
 
ललित पाटील प्रकरण
पुण्यातील अमली पदार्थांच्या कारवाईत अटक करण्यात आलेला गुंड पिंट्या माने येरवडा तुरूंगात होता. अमली पदार्थ तस्कर ललित पाटील आणि साथीदारांना चाकण परिसरात मेफेड्रोन बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. ललित आणि पिंट्या माने, हैदर शेख यांची येरवडा कारागृहात ओळख झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येतोय. गेल्या तीन वर्षांपासून ड्रग्स प्रकरणातील आरोपी ललित पाटील येरवडा कारागृहात आहे. पण तीन वर्षांपैकी नऊ महिने तो ससून रुग्णालयात दाखल होता. 2 ऑक्टोबर रोजी ससूनच्या 16 नंबरच्या कैदी वॉर्डमधून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ललित रूग्णालयातून फरार झाला.
 
या प्रकरणात पुणे पोलिस आयुक्तांनी निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत दोन महिला पोलीस अधिकाऱ्यांसह दहा पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं. त्यानंतर नोव्हेबर 2023 मध्ये या प्रकरणी नाथाराम काळे आणि अमित जाधव या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलेली. पुणे पोलिसांनी कारागृहातील समुपदेशक सुधाकर इंगळे यांना देखील अटक केली होती. त्यांच्याशी केलेल्या चौकशीतून येरवडा कारागृहाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. संजय मरसाळे यांचं नाव समोर आलेलं.
 
सुधाकर इंगळेमार्फत डॉ. संजय मरसळे यांना पैसे मिळाल्याचा दावा पुणे पोलिसांनी न्यायालयात केला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी डॉक्टर संजय मरसळे या दोघांना अटक केलेली. डॉ. संजय मरसळे यांनी पैसे घोऊन ललित पाटील याला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी शिफारस केली होती. डॉ. मरसळे यांच्या चौकशीत अभिषेक बलकवडे हे नाव समोर आलेलं. बलकवडे हा ललित पाटील याचा ड्रग्स कंपनी सांभाळणारा साथीदार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.
 
Published By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती