सना खान : 'भांडणानंतर डोक्यावर रॉडनं वार, मृतदेह नदीत फेकला'

शनिवार, 12 ऑगस्ट 2023 (09:37 IST)
नागपुरातील भाजपच्या कार्यकर्त्या सना खान या गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता होत्या. या प्रकरणात मध्य प्रदेशातून अमित साहू नामक आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आलीय.
 
अमित साहू यानं सना खान यांची हत्या केली असल्याची पोलिसांसमोर कबुली दिलीय.
 
नागपूर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर अमित साहूला अटक केली आणि अन्य दोन जणांना ताब्यात घेतलं.
 
सना खान 1 ऑगस्ट 2023 पासून बेपत्ता होत्या. मध्य प्रदेशातील जबलपूरहून त्या बेपत्ता झाल्या होत्या. 
 
सना खान या मध्य प्रदेशातील जबलपूरला गेल्या असताना त्यांचं अमोल साहू यांच्यासोबत जोरदार भांडण झालं.
 
त्यानंतर अमितनं सनाच्या डोक्यावर वार करून त्यांची हत्या केली आणि मृतदेह हिरण नदीत फेकून दिला, अशी प्राथमिक माहिती अमित साहूनं पोलिसांना दिली आहे.
 
हत्या करून सना खानला नदीत फेकलं - पोलीस
जबलपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक कमल मौर्य यांनी या प्रकरणाची माहिती देताना म्हटलं की, “4 ऑगस्टपासून पोलिस अमित साहूचा शोध घेत होते. सनाची हत्या केल्याचं त्यानं कबुल केलं आहे.
 
“आपआपसातील भांडण आणि पैशांसंदर्भातलं भांडण हे हत्येचं कारण आहे. त्यानंतर झालेल्या भांडणात अमितनं सनाच्या डोक्यावर रॉड मारला आणि मग तिचा मृतदेह नदीच्या पाण्यात फेकून दिला.”
 
सनाचा मृतदेह सापडल्यानंतर याप्रकरणी पुढील कारवाई करू, असंही कमल मौर्य पुढे म्हणाले.
 
जबलपूरच्या (मध्य प्रदेश) गोराबाजार पोलिसांनी आरोपी अमित साहू याची चौकशी केल्यानंतर त्याला हत्या केल्याच्या घटनास्थळीही नेलं.
 
पोलिसांनी अमित साहूसह एकूण 3 जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. जबलपूरच्या गोरा बाजार पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक नरेश तोमर यांनी ही माहिती दिली.
 
सना खान 10 दिवसांपासून बेपत्ता
सना 1 ऑगस्ट 2023 रोजी नागपूरहून जबलपूरला गेल्या होत्या. त्या 2 ऑगस्ट 2023 पासून बेपत्ता होत्या.
 
अमित साहू हा एक ढाबा चालक आहे. सनाने त्याच्यासोबत कोर्ट मॅरेज केलं होतं.
 
सनाची हत्या झाल्याची शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली होती.
 
सना ही नागपुरातील भाजप अल्पसंख्याक मोर्चाची सरचिटणीस होती.
 
FIR मध्ये काय म्हटलंय?
सना खान यांची आई मेहरुनिशा खान मोबीन खान यांनी 10 ऑगस्ट 2023 रोजी, म्हणजे सना खान बेपत्ता झाल्याच्या 10 दिवसांनंतर नागपूरच्या मानकापूर पोलिस ठाण्यात FIR नोंदवली.
 
या FIR मध्ये त्यांनी म्हटलं होतं की, “माझ्या मुलीची साधारणपणे वर्षभरापूर्वी अमित साहू याच्यासोबत ओळख झाली होती. अमित आणि तिचा जबलपूरमधील आशीर्वाद धाब्यामध्ये पार्टनरशिपमध्ये व्यवसाय होता. माझ्या मुलीनं त्याला व्यवसायासाठी एक 27 ग्रॅम वजनाच्या सोन्याची चैन आणि मोठी रक्कम दिली होती.
 
“1 ऑगस्ट रोजी सना आणि अमित यांचं फोनवर बोलणं सुरू होतं. तितक्यात सनाच्या खोलीमधून मला मोठमोठ्यानं बोलण्याचा आवाज ऐकू आला. ती म्हणत होती की, मला माझी सोन्याची चैन आणि पैसे परत हवेत.
 
“तर अमित साहू तिला म्हणाला की, तू जबलपूर ये आपण बसून बोलूया. त्यानंतर माझी मुलगी त्याच रात्री साडेअकरा वाजता जबलपूर जाणाऱ्या गाडीत बसली. माझी मुलगी जबलपूरला निघाली तेव्हा तिच्या अंगावर 9 ते 10 तोळे सोनं होतं.
 
“2 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता जबलपूरला पोहचल्याचं सनानं माझा भाचा इम्रान याला फोन करुन सांगितलं होतं. त्यानंतर तिनं परत फोन करुन मुलगा अल्तमष खान याच्याशी बोलणं केलं.
 
“त्यानंतर सनाचा फोन आला नाही आणि आम्हीही तिला फोन केला नाही. त्यानंतर अडीच वाजता अल्तमष शाळेतून घरी आला तेव्हा इम्राननं सनाला फोन लावला, पण तिचा फोन लागला नाही. तिला वारंवार फोन केले, पण तिचा फोन बंदच येत होता.
 
“3 ऑगस्टला मी अमितला फोन केला आणि सनाशी बोलणं करुन दे असं म्हटलं. त्यावर तो म्हणाला की, सना इथं आली होती. पण आमच्यात भांडण झालं आणि ती अर्ध्या तासात इथून निघून गेली. तिनं माझा मोबाईल फोडला आहे आणि ती इथून गेली आहे.
 
“ती कुठे गेली असं विचारल्यावर तो म्हणाला की, ती कुठे गेली मला माहिती नाही. मी घराचा दरवाजा बंद केला होता. त्यानंतर मी पुन्हा अमितला फोन केला. पण त्याचा फोन सतत बंद येत होता.”
 
दरम्यान, या प्रकरणात नागपूर क्राईम ब्रँच टीम आणि मानकापूर पोलीस तपास करत आहेत

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती