संभाजीराजे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 (16:04 IST)
मराठा आरक्षणासंदर्भात खासदार संभाजीराजे छत्रपती अधिक आक्रमक झाले आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने अद्याप मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आपण 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसणार आहोत, असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. तसेच याबाबत ट्विटही केले आहे. 
 
मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्र लिहिले आहे. या पत्रात 26 फेब्रुवारीपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण बसणार असल्याचे नमुद केले आहे. आपण 5 मे 2021 रोजी मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजाचे शैक्षणिक आणि सामाजिक नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाकडे समाजाच्यावतीने आम्ही काही मागण्या केल्या होत्या. 17 जून 2021 रोजी आपल्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या बैठकीत आपण या सर्व मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र, आज आठ महिने उलटले तरी या मागण्यांबाबत पुढे काहीही झालेले नाही, असे संभाजीराजे म्हणाले.
 
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत कोणतीही प्रशासकीय कार्यवाही झालेली दिसत नाही. यामुळे मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी या मागण्यांची ठोस अंमलबजावणी होईपर्यंत 26 फेब्रुवारीपासून आझाद मैदान, मुंबई येथे आपण आमरण उपोषणास बसणार आहे, असे ते म्हणाले.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती