महाराष्ट्रात ईडीने शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांना अटक केली आहे. शनिवारी त्यांना १५ मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. सदानंद कदम यांना हॉलिडे कोर्टात हजर केलं होतं. त्यावेळी ईडीच्या वकिलांनी त्यांनी १४ दिवसांची कोठडी मागितली. ज्यानंतर कोर्टाने त्यांना १५ मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
आमचं म्हणणं असं होतं की सदानंद कदम यांना चुकीच्या पद्धतीने अटक केली आहे . ईडी म्हणणं असं होतं की आम्हाला चौकशी करण्याची गरज आहे . दोघांचं म्हणणं ऐकून कोर्टाने १५ मार्च पर्यंतची कस्टडी दिली आहे. त्यांना घरातून जेवण आणि मेडिकल प्रोव्हाइड केली जाईल. त्यांची चौकशी केली जाईल तेव्हा ऍडव्होकेट त्यांच्यासोबत हजर राहू शकतो ही सुद्धा कोर्टाने परवानगी दिली आहे. कोर्टाची ऑर्डर आल्यावर तुम्हाला त्यांची उत्तर नक्कीच मिळतील असं सदानंद कदम यांचे वकील निरंजन मुंगधी यांनी सांगितलं आहे.
अनिल परब यांच्या सांगण्यावरुन सदानंद कदम यांनी विभास साठे यांच्यासोबत 80 लाखांचा व्यवहार केला. जवळपास 54 लाखात साई रिसॉर्टची बांधणी करण्यात आली. पण ऑन रेकॉर्ड त्याची किंमत साडेतीन कोटी रुपये दाखवण्यात आली. त्यामुळे हे सगळे पैसे नेमके कुठून आले? याचा तपास आम्हाला करायचा आहे. काही साक्षीदारांना समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे. या सगळ्या प्रकारामध्ये खोलवर जाऊन तपास करायचा आहे, असा युक्तिवाद ईडीच्या वकिलांनी केला.