धावत्या रेल्वेत प्रसुतीकळा सुरू होऊन डिलिव्हरी झाल्याच्या घटना बरेचदा ऐकण्यात, वाचण्यात येत असतात. असाच एक प्रकार सेवाग्राम एक्सप्रेस मध्ये नाशिक रोड रेल्वेस्टेशन दरम्यान घडला. विशेष म्हणजे ही घटना नाशिकजवळ घडल्यामुळे संबंधित महिलेने स्वत:च्या मुलाचे नाव नाशिक ठेवले. त्यामुळे या घटनेची सर्वत्र चर्चा आहे.
मुंबईहून नेहमीप्रमाणे सेवाग्राम एक्सप्रेस निघाली. नाशिक रोडस्टेशन जवळ येऊ लागले असता यातील एका एका महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्या. तिच्यासोबत असलेल्या इतर महिलांनी संपूर्ण परिस्थिती हाताळत डिलीव्हरी पार पाडली. एका गुटगुटीत बाळाचा जन्म झाला. त्यामुळे नाव काय ठेवणार, हा प्रश्न विचारला असता त्या महिलेने क्षणाचाही विलंब न करता नाशिक असे नाव ठेवल्याचे जाहीर करून टाकले. तिच्या या उत्तराची चर्चा संपूर्ण रेल्वेत झपाट्याने पसरली. ती ऐकून अनेकांनी तिची भेट घेतली, बाळाला आशीर्वाद दिलेत. तर काहींनी जमेल ती आर्थिक मदत देखील देऊ केली.