आमदार रोहित पवार कर्जत येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना भेटण्यासाठी गेले होते. जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या गायकरवाडी येथील कोविड केअर सेंटरला रोहित पवार यांनी भेट दिली. रुग्णांचे मनोबल वाढावे तसेच त्यांना मनोरंजन म्हणून तुषार घोडके यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी पवार रूग्णांच्या तब्येतीची चौकशी करीत होते. त्यावेळी मनोरंजन व्हावे म्हणून आयोजित कार्यक्रमात झिंगाटगाणं लागलं. या आनंदी वातावरणात ८० वर्षांच्या आजींनीही झिंगाटच्या गाण्यावर ठेका धरला आणि आमदार रोहित पवारांनीही त्यात सहभाग घेतला.
रोहित पवार यांनी ट्वीट केला व्हिडिओ
रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्वीट केला आहे. त्यात म्हटलं आहे की, गायकरवाडी येथील कोविड सेंटरमध्ये असलेलं गंभीर वातावरण हलकंफुलकं करण्यासाठी गायक तुषार घोडके यांच्या गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. यावेळी त्यांच्या झिंगाट गाण्यावर तिथल्या आजींनीही ठेका धरला आणि नकळत मीही त्यांच्यात सहभागी झालो, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.