उष्णतेपासून दिलासा; यंदा मान्सून लवकर धडकणार!

शनिवार, 14 मे 2022 (12:02 IST)
भारतात या वर्षी मान्सून लवकर दाखल होणार असून, त्यामुळे लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. एप्रिल 2022 मध्ये देशाचा उत्तरेकडील भाग आणि पश्चिम भागांमध्ये तीव्र उष्णतेची लाट (Heat Wave)आली होती, परंतु आता 15 मे पर्यंत मान्सून अंदमानमध्ये दाखल होईल अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे मान्सून लवकरच देशाच्या इतर भागातही पोहोचण्याची शक्यता आहे. कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झालेल्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा नैऋत्य मोसमी पाऊस लवकरच येत आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर 15 मे रोजी हंगामातील पहिला पाऊस अपेक्षित आहे. या वर्षी मान्सून वेळेच्या चार दिवस अगोदर 26 मे रोजी केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.
 
हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून यावेळी लवकरच अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होऊ शकतो. 15 मे रोजी या मान्सूनचा पहिला पाऊस पडू शकतो. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, यावेळी नैऋत्य मान्सून दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागराच्या परिसरात 15 मेच्या सुमारास पोहोचू शकतो.
 
पुढील पाच दिवसांत अंदमान आणि निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस पडेल, असे IMD सांगते. 14 ते 16 मे दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 15 आणि 16 मे रोजी दक्षिण अंदमान समुद्रावर 40 ते 60 किमी प्रतितास वेगाने वाऱ्याची शक्यता आहे.
 
हवामानशास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार केरळमध्ये मान्सून सुरू होण्यासाठी, तसंच उत्तरेकडे जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. कारण एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच देशातील बहुतांश भागांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. मान्सून साधारणपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. पुढील पाच दिवस अंदमान आणि निकोबार बेटांवर हलका-मध्यम पाऊस पडू शकतो, असं हवामान खात्याचं म्हणणं आहे.
 
अंदमान आणि निकोबार बेटांवर, 14 मे ते 16 मे पर्यंत वेगवेगळ्या भागात पाऊस पडू शकतो. यासोबतच ताशी 40-50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचीही शक्यता आहे. 15-16 मे रोजी दक्षिण अंदमान समुद्रातही जोरदार वारे वाहू शकतात.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती