ज्येष्ठना एसटीतील सवलतीच्या अमर्याद प्रवासाला मर्यादा

शुक्रवार, 28 जून 2019 (09:27 IST)
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना एसटीमध्ये मिळणार्‍या सवलतीच्या अमर्याद प्रवासाला आता मर्यादा लागणार आहे. राज्य शासनाने महामंडळाला केवळ 4 हजार किमीपर्यंतच ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीच्या प्रवासाची प्रतिपूर्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी एसटीचा 4 हजार किमीनंतरच्या प्रवासासाठी त्यांच्याकडून पूर्ण तिकिट आकारले जाणार आहे. प्रवासाची मर्यादा मोजता यावी, म्हणून एसटीकडून ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे.
 
राज्यातील 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तूर्तास एसटी प्रवासात साध्या बसमध्ये 50 टक्के, शिवशाही आसनयान (सीटर) बसमध्ये 45 टक्के आणि शिवशाही शयनयान (स्लीपर) बसमध्ये 30 टक्के सवलत मिळते. ज्येष्ठांना मिळणारी ही सवलत अमर्याद प्रवासासाठी होती. या सवलतीच्या टक्क्यांमध्ये कोणतीही कपात झालेली नाही. मात्र अमर्याद प्रवासाला राज्य शासनाने कात्री लावल्याने यापुढे महामंडळाकडून केवळ 4 हजार कि.मी.प्रवासापर्यंत ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात सवलत मिळणार आहे. सवलतीचा प्रवास मोजण्यासाठी महामंडळाने स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेत स्मार्ट कार्डमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी केलेला प्रवास वाहकांना मोजता येणार आहे. तसेच सवलतीचा प्रवास संपल्यानंतर पूर्ण तिकिट आकारले जाईल. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती