मुंबईसह कोकण किनारपट्टीत रेड अलर्ट जारी, मुख्यमंत्र्यांची वॉर रूमला भेट

बुधवार, 9 जून 2021 (16:13 IST)
मुंबईसह कोकण किनारपट्टीतही येत्या चार दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीला आज काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. पुढचे चार दिवस मुंबईत धुवांधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
 
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मान्सूनचं आगमन झालं असून अनेक ठिकाणी सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईत पुढच्या 4 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढचे 4 ही दिवस या सगळ्या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
मुंबई शहर आणि उपनगरात आज (9 जून) सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतोय. दादर (हिंदमाता, माटुंगा किंग सर्कल, गांधी मर्केट, अंधेरी, मालाड अशा काही ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे, तर शीव ते कुर्ला दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य रेल्वे सध्या ठप्प आहे.
 
चुनाभट्टी रेल्वे ट्रॅकजवळ पाणी साचल्याने सीएसएमटी ते वाशी मार्गावरील हार्बर रेल्वे सेवा सुद्धा तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. मध्य आणि हार्बल रेल्वे सेवा ठप्प असल्याने काही रेल्वे प्लॅटफॉर्म्सवर प्रवाशांची गर्दी आहे.
 
कुलाबा वेधशाळेने मुंबई महानगर क्षेत्रात 10 ते 13 जून दरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर मुंबईत आजपासून मान्सून दाखल झाल्याचेही वेधशाळेने स्पष्ट केले. संपूर्ण महाराष्ट्र व्यापायला मात्र अजून दोन दिवस लागतील, असा अंदाजही मुंबई हवामान विभागानं वर्तवला आहे.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मुंबईतील पाऊस आणि वाहतूक कोंडचा आढावा घेतला. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा तातडीने करण्यासंदर्भात आणि वाहतूक सुरळीत होईल याकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे निर्देश उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
 
कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्राच्या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी म्हटलं, "9 जूनपासून कोकणात मुसळधार पाऊस सुरू होईल. 11 जूनला अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. या पावसाचा प्रभाव सर्वाधिक उत्तर कोकणात असेल.
 
मुंबई, ठाणे, रायगड या भागात अतिवृष्टी होऊ शकते. त्यासाठी नागरिकांना गरज नसल्यास बाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आला आहे."
 
नुकतंच तौक्ते चक्रीवादळामुळे मोठं नुकसान कोकणात बघायला मिळालं. त्यामुळे या अतिवृष्टीसाठी सरकारकडून पूर्वनियोजन करण्यात आले आहे. यंत्रणांनी सतर्क राहण्याचे आदेशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
 
मुख्यमंत्र्यांची वॉर रुमला भेट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी महापालिका मुख्यालयातील वॉर रुमला भेट दिली.
 
आजच्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापालिकेत आप आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आलं आहे.
 
दुपारी सव्वातीनच्या सुमारास मुख्यमंत्री ठाकरे आणि आयुक्त चहल मुख्यालयात दाखल झाले. त्यांनी पावसामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा आढावा घेतला. तसंच त्याबाबत संबंधितांना योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती