रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी, आजपासून दोन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

गुरूवार, 10 जून 2021 (16:10 IST)
कोकणातील रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिवृष्‍टीच्‍या पार्श्‍वभूमीवर अत्‍यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्‍यवहार बंद राहणार आहेत.  रायगड जिल्‍हा प्रशासनाने तसा निर्णय घेतला आहे. तसेच दरडग्रस्‍त भाग तसेच जुन्‍या इमारतीमधील रहिवाशांचे स्‍थलांतर करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आजपासून दोन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.
 
रायगड जिल्हयात आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दवाखाने, मेडिकल स्टोर वगळता जिल्‍हयातील सर्व दुकानं आणि कार्यालयं बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेता संभाव्य दरडग्रस्त भागातील 1 हजार 139 नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. नागरीकांना घराबाहेर पडण्‍यास मनाई करण्‍यात आली आहे. जिल्‍हयात अतिवृष्‍टीचा इशारा देण्‍यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर वित्‍त व जीवीतहानी टाळण्‍यासाठी हा निर्णय घेण्‍यात आला आहे.
 
रायगडच्‍या जिल्‍हाधिकारी निधी चौधरी यांनी दोन दिवसांच्या लॉकडाऊनबाबतचे आदेश काढले आहेत. आपत्‍तीचा सामना करण्‍यासाठी प्रशासन सज्‍ज आहे. अतिवृष्‍टीत दरडी कोसळण्‍याचा धोका असतो. त्‍यामुळे पूर्वी दरडी कोसळलेल्‍या व संभाव्‍य दरडग्रस्‍त भागातील 1 हजार 139 नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्‍यात आले आहे. तर जुन्‍या जीर्ण झालेल्‍या इमारतीमधून 111 नागरिक आणि 15 कुटुंबांचे अन्‍यत्र स्‍थलांतर करण्‍यात आले आहे. दरम्‍यान अतिवृष्‍टीच्‍या काळात कुणीही घराबाहेर पडू नये, असं आवाहन जिल्‍हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती