नांदगाव विधानसभेचे शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांचे पोस्टर अज्ञाताने फाडले आहे. नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील वसंत तांडा येथे रस्त्यावर उभारलेल्या स्टँडवरील त्यांचे पोस्टर लावले होते. ते फाडण्यात आले आहे. विशेष म्हणजे, कांदे हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. आणि मुख्यमंत्र्यांचा शनिवारी नांदगावमध्ये दौरा आहे. त्या पार्श्वभूमीवर कांदे यांचे पोस्टर फाडण्यात आले आहे.
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा मनमाडमध्ये नुकताच दौरा झाला आहे. त्यापाठोपाठ आता एकनाथ शिंदे हे स्वतः नांदगाव मतदारसंघात येत आहेत. त्यामुळे कांदे गटाकडून त्याची जौरदार तयारी सुरू आहे. त्यातच पोस्टरचा प्रकार घडला आहे. पोस्टरवरील आमदार कांदे यांचे नाव अज्ञात लोकांनी मिटवल्याने आमदार समर्थकांनी या घटनेचा निषेध केला आहे. या घटनेमुळे यापुढे आणखी संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आमदार कांदे हे एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याने अनेक कडवट शिवसैनिकांना ही गोष्ट खटकली. त्यामुळे अनेक शिवसैनिकांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यातून हा प्रकार घडला की कोणीतरी संघर्ष वाढावा म्हणून हे कृत्य केले हे शोधणे गरजेचे आहे. दरम्यान, या घटनेमुळे कांदे गट आणि शिवसेना गट यांच्यात आगामी काळात संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत.