अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार, राजकीय आयुष्याची नवीन सुरुवात करत असल्याची प्रतिक्रिया

मंगळवार, 13 फेब्रुवारी 2024 (12:52 IST)
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण दुपारी 12.30 वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडेल. स्वत: अशोक चव्हाण यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली.
 
माझ्या राजकीय आयुष्याची नवीन सुरूवात करत आहे, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी आपण भाजप मध्ये जाणार असल्याचं स्पष्ट केलं.
 
अशोक चव्हाण यांनी काल (12 फेब्रुवारी) काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला.
 
अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, "मी दिनांक 12/02/2024 च्या मध्यान्हापासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर करत आहे."
 
पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं पत्र अशोक चव्हाणांनी ज्या लेटरहेडवर लिहिलंय, त्या लेटरहेडवरील 'विधानसभा सदस्य' या शब्दांपुढे 'माजी' असे पेनाने लिहिलं होतं. त्यानंतर ट्वीट करून त्यांनी स्पष्टही केलं की, भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला.
 
काल (12 फेब्रुवारी) काँग्रेस पक्षातून बाहेर पडताना अशोक चव्हाणांनी म्हटलं होतं की, दोन दिवसात पुढची दिशा ठरवेन. आज (13 फेब्रुवारी) सकाळी त्यांनी भाजप प्रवेशाची माहिती दिली.
 
काल अशोक चव्हाण म्हणाले होते की, "मला काँग्रेसमधील कुठल्याही गोष्टीची वाच्यता बाहेर करायचं नाहीय. मला कुणाचीही उणीदुणी काढायची नाहीत. ते माझ्यात स्वभावात नाही."
 
"अशोक चव्हाणांना काँग्रेस पक्षानं खूप दिलं, तसंच पक्षालाही अशोक चव्हाणानं खूप दिलं. दोन्ही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात," असंही चव्हाण म्हणाले.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती