रांगोळी प्रदर्शनातून जात-पात, धार्मिक तेढ मिटविण्यासाठी प्रबोधन
गुरूवार, 11 जानेवारी 2018 (14:43 IST)
भीमा-कोरेगाव येथील संघर्षामुळे झालेला उद्रेक पाहून मन हेलावून गेलं. स्वातंत्र्यानंतर दोन धर्मांमध्ये पेटलेला वणवा आता जाती-पातींमध्ये पसरतोय. जात-पात, धर्म, विषमता आणि इतिहासाच्या नावाने निर्माण झालेली सामाजिक दरी अधिक रूंद होत चाललीय. वर्चस्ववादाच्या ह्या झगड्यात आता लहान मुलही हिंसक होत आहेत. हे पाहून मनं अस्वस्थ झाली. जे चाललंय ते अत्यंत दुर्दैवी आहे. हाच का तो संत-महंत-विद्वान-कतृत्ववानांची परंपरा जपलेला महाराष्ट्र? या प्रश्नांने मनात काहूर माजलं, पण करणार काय?
भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि अनेक संत-महंतांच्या विचारधारेवर चालणाऱ्या महाराष्ट्राला हे अशोभनीय आहे. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, याच युगपुरूषांचे तथाकथित अनुयायी केवळ वर्चस्व सिद्ध करण्यासाठी किंवा सत्ता मिळविण्यासाठी तुम्हा-आम्हाला एकमेकाशी झुंजवत आहेत. आणि आपणही, सहजपणे त्या युगपुरूषांचे विचार आणि बलिदान विसरून आपसात लढतोय. हे कुठेतरी थांबायला हवं!
खरंच! तुम्हालाही हे थांबावं, असं वाटत असेल तर चला! या देशाचे सुशिक्षित आणि सुसंस्कारी नागरीक म्हणून कांजूर-भांडुपच्या चाळकऱ्यांसोबत रांगोळीच्या माध्यमातून त्या महान व्यक्तिमत्वांच्या विचारांची कास धरूया. कांजुर-भांडुप पूर्व येथील श्रीगणेश सेवा मंडळाने जात-पात, धर्म आणि सामाजिक वर्चस्ववादाच्या संघर्षात हरवलेल्या माणुसपणाची जाणीव करून देण्यासाठी भव्य रंगावली प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. शनिवार दि. 13 जानेवारी 2018 रोजी संध्याकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.
रांगोळी प्रदर्शन बहुदा बंदिस्त सभागृहात आयोजित केले जाते. पण, कांजूर-भांडुपसारख्या कामगार बहुल वस्तीतील श्री गणेश सेवा मंडळ गेली अठरा वर्षे दोन बैठ्या चाळींतील मधल्या मोकळ्या जागेत कलेच्या माध्यमातून सांस्कृतिक-सामाजिक भान जपत आहे. आजवर अच्युत पालव, गोपाळ बोधे, प्रकाश लहाने, विशाल शिंदे, सौरभ महाडीक, राहूल आगासकर, अभिषेक सुन्का आदी कलाकारांची कलाप्रदर्शन इथे आयोजित करण्यात आली आहेत. पेंटींग्ज, पोर्ट्रंट, छायाचित्र किंवा मूर्ती, हस्तकला आणि प्राचीन वस्तूंचे, शस्त्रांचे प्रदर्शन तसेच स्वत: तयार केलेल्या माहितीपटांचे आणि लघुपटांचे आयोजन करून तेथील सामान्य नागरिकांचे प्रबोधन हे मंडळ करीत आहे.
या रांगोळी प्रदर्शनात रांगोळी रेखाटण्यासाठी दीपक गोळवणकर, वेदांती शिंदे, निकीता राणे, विकास नांदिवडेकर, ओंकार नलावडे, प्रतिक्षा राणे, जोत्स्ना चव्हाण आणि प्रियंका साळवी आदी मुंबईतील उदयोन्मुख रांगोळी कलावंत सहभागी झाले आहेत.
“बैठी चाळ असल्याने हे प्रदर्शन केवळ एका संध्याकाळी मांडण्यात येते. परंतु, ते पाहाण्यासाठी संध्याकाळच्या वेळेत हजारो रसिकप्रेक्षक येतात. इथल्या स्थानिकांना वर्षभर आमच्या कार्यक्रमाची उत्सुकता असते. कलारसिकांचा मिळणारा प्रतिसाद आमचा उत्साह आणि कल्पकता वाढवतो. त्यामुळे दरवर्षी एक नवीन कला आणि त्यातून सामाजिक संदेश देण्याला आम्ही प्राधान्य देतो.”असे मंडळाचे खजिनदार निलेश गळंगे यांनी सांगितले.
श्री गणेश सेवा मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही शनिवार दि. 13 जानेवारी रोजी जगदगुरू श्री साईनाथ महोत्सवाचे (साईभंडारा) आयोजन भगवती निवास, शिवकृपा नगर, कांजुरगांव, भांडुप पूर्व येथे केले आहे. धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांचे सामाजिक, सांस्कृतिक आणि कलाभान जपावे या हेतूने प्रदर्शनाची सुरूवात झाली.