रामदास कदम- आम्ही गद्दार नाही, उद्धव ठाकरेंनीच बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसलाय

गुरूवार, 28 जुलै 2022 (22:14 IST)
प्राजक्ता पोळ
 
"मी मरणार तर भगव्या झेंड्यामध्येच मरणार... तेव्हा उध्दव ठाकरेंची शिवसेना होती. आता मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत आहे. बाळासाहेबांचे विचार असलेल्या शिवसेनेत आहे," असं विधान रामदास कदम यांनी बीबीसी मराठीशी बोलताना केलं आहे.
 
रामदास कदम यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते पदाचा राजीनामा दिला होता, तर शिवसेनेनं रामदास कदम यांची हकालपट्टी केल्याचं म्हटलं होतं.
 
"हा दिवस कधी येईल असं वाटलं नव्हतं. आमच्यावर अशी वेळ येईल असं वाटलं नव्हतं. माझ्या मुलाला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न झाला. आम्ही तुमचं काही वाईट केलं नाही. आम्ही काही चूक केली नाही," असं राजीनामा दिल्यानंतर रामदास कदम यांनी म्हटलं होतं.
 
त्यानंतर एकनाथ शिंदे गटात गेलेल्या कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अनेक आरोप केले आहेत.
 
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ यांनी रामदास कदम यांच्याशी संवाद साधला. शिवसेना आणि उद्धव ठाकरेंबद्दल तसंच आपल्या पुढच्या वाटचालीबद्दल रामदास कदम यांनी काय म्हटलं? उध्दव ठाकरेंनी 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत जे आरोप शिंदे गटावर केले त्या आरोपांना रामदास कदम यांनी काय प्रत्युत्तर दिलं आहे?
 
... अन्यथा बाळासाहेबाच्या आत्म्याला शांती मिळणार नाही
'मी शेवटच्या क्षणापर्यंत मी शिवसेनेतच राहणार' असं वारंवार सांगणारे माजी मंत्री रामदास कदम आता शिंदे गटाच्या नेते पदी आहेत.
 
'एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते' अशी ओळख करून दिली जाईल असं वाटलं होतं का? हा प्रश्न रामदास कदम यांनी आम्ही विचारला.
 
त्यावर रामदास कदम यांनी म्हटलं, "मी आजही माझ्या 'त्या' वाक्यावर ठाम आहे. मी मरणार तर भगव्या झेंड्यामध्येच मरणार... तेव्हा उध्दव ठाकरेंची शिवसेना होती. आता मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत आहे. बाळासाहेबांचे विचार असलेल्या शिवसेनेत आहे."
 
उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर 'प्रॉब्लेम' काय आहे? या प्रश्नावर बोलताना रामदास कदम यांनी म्हटलं, "ज्या शिवसेनाप्रमुखांनी त्यांचं उभं आयुष्य काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संघर्ष करण्यात आणि हिंदुत्व वाढवण्यात घालवलं अशा पक्षांबरोबर जाऊन उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले हा आम्हाला 'प्रॉब्लेम' आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीच बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलंय असं मला वाटतं."
 
"हे जेव्हा घडत होतं तेव्हा मी सांगितलं होतं की, कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर जाऊ नका नाहीतर बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. हे मी 'मातोश्री'वर जाऊन बोललो आहे. त्यावर उध्दव ठाकरेंनी काहीही उत्तर दिलं नाही."
 
"बाळासाहेब ठाकरे असते तर उध्दव ठाकरेंना कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन मुख्यमंत्री होऊ दिलं असतं का? हा प्रश्न महाराष्ट्रात कोणालाही विचारा...हा आमचा प्रॉब्लेम आहे," असंही रामदास कदम यांनी म्हटलं.
 
मंत्रिपदं दिली म्हणजे काय भीक दिली?
तुमच्यातल्या अनेक नेत्यांना भरभरून दिलं पण फुटीरवाद्यांची राक्षसी महत्वाकांक्षा संपतच नाही या उद्धव ठाकरेंच्या आरोपाबद्दल रामदास कदमांनी म्हटलं, "आम्हाला मंत्रिपदं दिली तर काय भीक दिलीत? आम्ही 52 वर्षे घासलीये पक्षासाठी... आम्ही जेल भोगले आहेत. अंगावर केसेस घेतल्या आहेत. आम्हाला जे काही मिळालं ते आम्ही संघर्ष करून मिळवलं आहे.
 
तुम्ही त्या खुर्चीवर बसला ते फक्त बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा म्हणून... त्या व्यतिरिक्त तुमचं शिवसेनेसाठी योगदान काय आहे? 10-20 केसेस कधी अंगावर घेतल्या आहेत का? कधी रस्त्यावर आलात? कधी संघर्ष केलाय? आम्ही 10-10 वेळेला जेल भोगल्या आहेत."
 
तुम्ही म्हणताय की, तुम्ही 52 वर्ष संघर्ष केला. आता हे सगळं घडल्यावर काय भावना आहेत? या प्रश्नाचं उत्तर देताना रामदास कदमांनी म्हटलं की, आम्ही आमच्या संघर्षाने उभा केलेला पक्ष जेव्हा पत्त्यासारखा कोसळतो तेव्हा काय वाटतं हे शब्दात सांगता येत नाही.
 
"उद्धव ठाकरेंना सगळं आयतं मिळाला आहे त्यांचे पक्षासाठी काय योगदान आहे, पण आम्ही सगळ भोगलं आहे आमचा खून करण्यासाठी अनेकदा सुपार्‍या देण्यात आल्या आहेत. त्यातून आम्ही वाचलो आहोत म्हणून आमचं मन दुखावलं आहे. याच्यापुढे डोळ्यातून पाणी काढणार नाही हे मी ठरवलंय. यापुढे मी समोरच्याच्या डोळ्यातून पाणी काढणार."
 
गद्दार कोण आहे ?
या मुलाखतीत बोलताना कदम यांनी म्हटलं, "बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठका घ्यायचे. नेत्यांची मतं जाणून घ्यायचे बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर हे सगळं बंद झालं. शिवसेनेतून नेत्यांना बाजूला करण्यात आलं. उद्धव ठाकरे हे हुकूमशहा झाले. उध्दव ठाकरे म्हणाले होते, की बाळासाहेब साधे होते, मी पक्का आहे. आज त्यांना कळलं असेल बाळासाहेब साधे होते की तू कच्चा आहेस. "
 
"बाळासाहेबांची शिवसेना मी दोन पावलं अधिक पुढे घेऊन जाणार असं उद्धव ठाकरे म्हणायचे. आता किती पावलं मागे आणून ठेवली शिवसेना? शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी प्रतारणा करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. त्यामुळे गद्दार 51 आमदार नाहीत, तर गद्दार तुम्ही आहात. माणूस बुडताना हातपाय हलवतो. त्याचप्रमाणे या 51 आमदारांनी जर हा निर्णय घेतला नसता तर पुढच्या विधानसभा निवडणुकीला यातला एकही आमदार निवडून आला नसता."
 
"बाप दाखवा किंवा श्राद्ध घाला...हवेत कशाला बाण मारताय. हे सगळं लोकांना दाखवण्यासाठी कटकारस्थान करण्यात उद्धव ठाकरेंचा हात कोणीच धरू शकणार नाही. जो माझा अनुभव आहे. आता ते सांगतात, की मी आजारी असताना कटकारस्थानं झाली वगैरे वगैरे...लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी काहीही बोलणं बंद करा," असंही रामदास कदम यांनी म्हटलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती