राज ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल, उद्याच्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष
शनिवार, 30 एप्रिल 2022 (22:07 IST)
राज ठाकरे यांनी एबीपी माझा कट्टा या कार्यक्रमात बोलताना म्हटलं की, "भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे. प्रत्येकानं आपापला धर्म आपापल्या घरामध्ये ठेवावा. तो रस्त्यात आणू नये. 365 दिवस भोंगे चालू ठेवणं मला योग्य वाटत नाही. एखादा सण, समारंभ असेल तर ते आपण समजू शकतो."
मनसे प्रमुख राज ठाकरे औरंगाबादला पोहोचले आहेत. उद्या त्यांची औरंगाबादमध्ये सभा आहे. त्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
याआधी राज ठाकरे काल (29 एप्रिल रोजी) पुण्याला मुक्कामी होते. त्यानंतर आज सकाळी ते पुण्याहून निघाले. वाटेत त्यांनी वढू बुद्रूक येथे जाऊन संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतलं आणि आता ते औरंगाबादच्या दिशेनं निघाले आहेत.
1 मे रोजी राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा आहे. या सभेला संबोधित करण्यासाठी ते आज शहरात पोहोचणार आहेत.
याआधी गुढीपाडव्याच्या सभेत राज यांनी मशिदीवरील भोंग्याच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यासाठी त्यांनी 3 मेपर्यंत मुदतही दिली होती.
आता 1 मे रोजीच्या सभेत राज ठाकरे नेमकी काय घोषणा करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
मनसेची तयारी
या सभेला परवानगी मिळण्यापूर्वीच मनसेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली आहे.
ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा होणार आहे, तिथं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्तंभपूजन केलं आहे.
त्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सभास्थळी भेट देऊन पाहणी केली, तर आज राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनीही सभास्थळाची पाहणी केली.
जवळपास चार एकर क्षेत्रावर पसरलेल्या या मैदानाची बुकिंग राज ठाकरे यांनी 28, 29 व 30 एप्रिल आणि 1 मे अशा चार दिवसांसाठी केली आहे.
याशिवाय भाषणासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी पाण्याची सोयही मनसेच्या वतीनं केली जाणार आहे.
अनेकांचा विरोध
राज ठाकरे यांच्या या सभेला वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग यांनी विरोध दर्शवला आहे.
तर औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीसाठी निमंत्रण दिलं आहे.
दुसरीकडे शिवसेनेनं मात्र राज यांच्या सभेवर आरोप केले आहेत.
राज ठाकरेंची सभा झाल्यास औरंगाबादमध्ये दंगली घडतील, असं शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी बीबीसी मराठीबरोबर बोलताना म्हटलं आहे.
मनसेनं मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे.
राज ठाकरे यांच्या सभेमुळे आतापर्यंत कधी दंगल झाली, हे खैरेंनी दाखवून द्याव, असं मनसेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी बीबीसी मराठीबरोबर बोलताना म्हटलं आहे.
सभेला परवानगी, पण ...
राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेला परवानगी मिळाली आहे. पण, या सभेसाठी काही अटी पोलिसांनी दिल्या आहेत. सभेसाठी या अटींचं पालन करावं लागणार आहे. अशा 16 अटी औरंगाबाद पोलिसांनी घातलेल्या आहेत.
"सभेदरम्यान कोणत्याही प्रकारे वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म इत्यादी किंवा ते पाळत असणाऱ्या प्रथा- परंपरा यावरुन कोणत्याही व्यक्ती व समुदायाचा अपमान होणार नाही, अगर त्याविरोधात चिथावणी दिली जाणार नाही अशी कृती वक्तव्य घोषणाबाजी कोणीही करणार नाही याची आयोजक व वक्त्यांनी काळजी घ्यावी," सभेसाठी अशी मुख्य अट आहे.
ध्वनी प्रदूषण होणार नाही, धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही, सामाजिक वातावरण बिघडणार नाही. सामाजिक सलोखा बिघ़डेल असं वर्तन होणार नाही याची खबरदारी सभेदरम्यान घ्यावी लागणार आहे.
सर्व अटी नागरिकांना कळवण्याची जबाबदारी आयोजकांवर असल्याचे या रवानगीत म्हटलं आहे. या सभेसाठी 15 हजार लोकांनाच बोलावता येईल, वाहतूक नियमांचे पालन करावं लागेल. आक्षेपार्ह घोषणा देता येणार नाही. शस्त्रं, स्फोटक पदार्थ आणता येणार नाहीत, त्यांचं प्रदर्शन करता येणार नाही असं पोलिसांनी दिलेल्या अटीत म्हटलं आहे.
औरंगाबादमध्ये जमावबंदी
दरम्यान, औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी शहरात 13 दिवसांची जमावबंदी लागू केली आहे.
या आदेशात नमूद केल्यानुसार, "आगामी काळात मनसे पक्षाकडून मशिदीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. अनेक संघटनांचा त्याला विरोध आहे. त्याचबरोबर मुस्लिम आरक्षण, ओबीसी आरक्षण, कामगार मागण्या यासाठी आंदोलनात्मक कार्यक्रम घेतले जाणार आहेत.
"औरंगाबाद हे एक संवेदनशील शहर असून तिथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि त्याची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात येत आहेत. त्याचबरोबर पाचपेक्षा अधिक व्यक्तींना जमण्यास, मोर्चा काढण्यास, धरणे धरण्यास, घोषणाबाजी करण्यास आणि मिरवणूका काढण्यास मनाई करण्यात येत आहे."