राज ठाकरे – देवेंद्र फडणवीस यांची शाब्दिक वादानंतरची पहिली भेट

मंगळवार, 30 मे 2023 (08:05 IST)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ येथे पोहचले आहे. रात्री सव्वादहाच्या दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. या दोन दिग्गज नेत्यांमध्ये एक तासांपेक्षा जास्तवेळ चर्चा झाली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चा रंगत आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेणं ही भाजपची मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या मोठ्या रणनीतीचा भाग असण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे.
 
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नुकतेच कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर शाब्दिक युद्ध रंगलेले महाराष्ट्राने पाहिले होते. राज ठाकरे यांनी कर्नाटक निकालातून जनतेला गृहित न धरण्याचा बोध घेण्याचा सल्ला भाजपला दिला होता. त्यावरुन फडणवीस यांनी बाहेरच्यांनी आम्हाला सल्ले देऊ नये, असे राज यांना सुनावले होते. नाशिक जिल्हा दत्तक घेण्याचे विधान फडणवीसांनी २०१७ मध्ये केले होते. त्याची आठवण राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांत पत्रकारांना करुन दिली होती. नाशिक दत्तक घेणारे आता कुठे आहेत? असा सवाल करत राज यांनी फडणवीसांना जोरदार टोला लगावला होता. या शाब्दिक वादानंतर फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही पहिली भेट आहे.

भाजपची मुंबई महापालिका निवडणूक तयारी
भारतीय जनता पक्ष सध्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. यानिमित्ताने भाजपचे मुंबईत विविध कार्यक्रम होत आहेत. सोमवार दुपारी सव्वा बारा वाजता भाजपचा मुंबई महाजनसंपर्क अभियान कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, उपमुख्यमंत्री फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, महासंपर्क अभियान प्रमुख प्रवीण दरेकर उपस्थित होते.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती