थायलंड आणि कंबोडियामधील संघर्ष शनिवारी चौथ्या दिवशीही सुरूच राहिला. दोन्ही देशांमधील युद्धात आतापर्यंत32 जणांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोकांना सीमावर्ती भागातून विस्थापित व्हावे लागले. विस्थापित लोकांना तात्पुरत्या आश्रयस्थानांमध्ये आश्रय घ्यावा लागला. दरम्यान, दोन्ही बाजूंमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची भीती आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने या मुद्द्यावर आपत्कालीन बैठक घेतली. बैठकीनंतर कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आले नसले तरी, परिषदेच्या एका राजनयिकाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व 15 सदस्य देशांनी थायलंड आणि कंबोडियाला संयम बाळगण्याचे, तणाव कमी करण्याचे आणि वाद शांततेने सोडवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, दक्षिणपूर्व आशियाई राष्ट्रांच्या संघटनेला (आसियान) सीमा वादात मध्यस्थी करण्याची विनंती देखील करण्यात आली.
सध्या आसियानचे अध्यक्ष असलेल्या मलेशियानेही दोन्ही देशांना हा संघर्ष तात्काळ संपवण्याचे आवाहन केले आहे आणि मध्यस्थी करण्याची ऑफर दिली आहे. कंबोडियाचे संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत छिया केओ म्हणाले की, आपत्कालीन बैठकीची मागणी कंबोडियाने केली होती. त्यांनी बिनशर्त युद्धबंदी आणि वादावर शांततापूर्ण तोडगा काढण्याची मागणी पुन्हा केली.
कंबोडियातील नागरिकांसाठी भारताने अॅडव्हायझरी जारी केली
कंबोडियातील भारतीय दूतावासाने जारी केलेल्या अॅडव्हायझरीमध्ये म्हटले आहे की, "थायलंड-कंबोडिया सीमेवर सुरू असलेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर, भारतीय नागरिकांना या सीमावर्ती भागात प्रवास करणे टाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. यासोबतच, दूतावासाने आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी एक हेल्पलाइन नंबर आणि ईमेल आयडी देखील शेअर केला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत भारतीय नागरिक दूतावासाच्या हेल्पलाइन +855 92881676 वर संपर्क साधू शकतात किंवा
[email protected] वर ईमेल पाठवू शकतात.