हवामान विभागाने (IMD) सांगितले की नैऋत्य मान्सून बुधवारी बंगालच्या उपसागरात पोहोचला आणि तो २७ मे रोजी केरळला धडकेल. हवामान विभागाने बिहार आणि छत्तीसगडसह १४ राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा जारी केला आहे. हवामान खात्याने सांगितले की, अंदमान समुद्रावर चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. यामुळे १६ ते २२ मे दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते, तर २४ ते २६ मे दरम्यान ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारी भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, दक्षिण द्वीपकल्पीय भारत आणि लगतच्या मध्य भारतात पुढील ४ दिवसांत वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये पुढील ३-४ दिवसांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच १५ ते १८ मे दरम्यान कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार वाऱ्यांसह वादळ येण्याची शक्यता आहे. तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी आणि यानम, रायलसीमा, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल, केरळ आणि माहे येथे हलक्या/मध्यम पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.