शिवसेनेच्या महिला नेत्या मनिषा कायंदे यांचा भाजपला सवाल

शुक्रवार, 26 ऑगस्ट 2022 (22:45 IST)
शिवसेनेच्या महिला नेत्या मनिषा कायंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावरुन, हिंदुत्वाचा सवालही केला. त्या व्हिडिओत देवेंद्र फडणवीस हे बाबा ताजुद्दीन यांच्या चरणी आपण नतमस्तक होत असल्याचं सांगत भाविकांना शुभेच्छा देत असताना दिसून येत आहेत. 'सय्यद हजरत मोहम्मद बाबा ताजुद्दीन यांचा उरुस दरवर्षी साजरा केला जातो. यंदा उरूसची शतकपूर्ती होत आहे. त्यामुळे, मी बाबा ताजुद्दीन यांच्या सर्व भाविकांना शुभेच्छा देतो आणि बाबा ताजुद्दीनच्या चरणी नतमस्तक होतो, असे फडणवीस यांनी म्हटलं आहे.
 
ताजुद्दीन बाबा नागपूर आणि अनेक ठिकाणाहून आलेल्या भाविकांसाठी प्रेरणास्थान राहिले आहेत. कुठल्याही धर्माचा व्यक्ती असो, तो ताजुद्दीन बाबांच्या दर्गावर दर्शन करण्यासाठी जात असतो. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, तेव्हा ताजबाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला होता, त्यामुळे, अनेक विकासकामे येथे पूर्ण झाली. येथे येणाऱ्या भाविकांची मोठी सोय झाली. यापुढेही राज्य सरकार मदत देण्यासाठी सदैव तत्पर आणि तय्यार राहिल, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
 
शिवसेनेच्या नेत्या आमदार मनिषा कायंदे यांनी उपमुख्यमंत्र्यांचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, यासोबत उद्धव ठाकरेंची तुलना करणारे कॅप्शन देत भाजपवर निशाणा साधला. हेच जर उद्धव ठाकरेंनी केलं असतं, तर त्यांनी हिंदुत्त्व सोडलं असा अपप्रचार केला असता.... असे कॅप्शन आमदार कायंदे यांनी दिलं आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती