खासगी बस पूर्ण क्षमतेने धावणार, मात्र बस वाहतूकदारांना निर्देशांचे पालन करावे लागणार

शनिवार, 7 नोव्हेंबर 2020 (10:44 IST)
खासगी बसेसमधून पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुकीस परवानगी देण्याच्या परिवहन आयुक्‍त कार्यालयाच्या प्रस्तावास अखेर राज्याच्या गृह (परिवहन) विभागाने मंजुरी दिली. त्यामुळे 50 टक्के क्षमतेने राज्यात प्रवासी वाहतूक करणार्‍या खासगी बसचालकांना दिवाळीत मोठा दिलासा मिळाला आहे. 
 
सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असलेल्या प्रवाशांना मात्र प्रवासास मनाई केली आहे. बस वाहतूकदारांना निर्देशांचे पालन करावे लागणार आहे. दररोज बसच्या प्रत्येक फेरीनंतर त्याचे निर्जंतुकीकरण करावे लागेल. प्रवाशांना मास्क सक्‍तीचा असून बसचालकांनी प्रवाशांना मास्क पुरवण्यास सांगितले आहे. बसच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर ठेवावा, जेवण किंवा अल्पोपहार आणि प्रसाधनगृहाजवळ बस थांबवताना प्रवाशांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. 
 
ताप, सर्दी-खोकला असल्यास प्रवेश नाही
 
- बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची थर्मल-गनद्वारे तपासणी करावी. 
- एखाद्या प्रवाशास ताप, सर्दी-खोकला अशा कोविड आजाराची प्राथमिक लक्षणे दिसत असल्यास त्यांना प्रतिबंध करावा. 
- तसेच प्रवासादरम्यान शारीरिक अंतर ठेवण्याची दक्षता घेण्याबाबत प्रवाशांना सूचना द्याव्यात.
- सर्वांच्या नोंदी ठेवाव्यात, आदी सूचनाही देण्यात आल्या. या सर्वांच्या नोंदणी ठेवणे बंधनकारक आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती