परीक्षा केंद्रावर अनावधानाने अगोदरच उघडली प्रश्नपत्रिका आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे तातडीने उपाययोजना बदलण्यात आली प्रश्नपत्रिका

बुधवार, 8 नोव्हेंबर 2023 (21:27 IST)
नाशिक:  अनावधानाने अगोदरच उघडण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेसाठी विद्यापीठाकडून तातडीने उपाययोजन करण्यात आली आहे.या अनुषंगाने विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी-2023 सत्राच्या लेखी परीक्षा दि 28 ऑक्टोबर 2023 ते 08 नोव्हेंबर 2023 कालावधीत घेण्यात येत आहेत. राज्यभरातील पन्नास परीक्षा केंद्रावर या परीक्षा सुरु आहेत.

त्यांनी पुढे सांगितले की, दि. 06 नोव्हेंबर 2023 रोजी एका परीक्षाकेंद्रावर अनवधानाने एम.बी.बी.एस-2019च्या अभ्यासक्रमाच्या बायोकेमिस्ट्री भाग एक विषयाऐवजी बायोकेमिस्ट्री  भाग दोनची विषयाची प्रश्नपत्रिकेचा बॉक्स उघडण्यात आला. बायोकेमिस्ट्री  भाग दोनची विषयाची परीक्षेचे आयोजन दि. 08 नोव्हेंबर 2023 रोजी करण्यात आले होते. सदर बाब लक्षात येता विद्यापीठाने तातडीने उपाययोजना केली.

मा. कुलगुरु महोदया यांच्या आदेशानुसार राज्यातील 50 परीक्षाकेंद्रावर बायोकेमिस्ट्री भाग दोन विषयाचा दुसरी प्रश्नपत्रिका विद्यापीठामार्फत पुरविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

तातडीच्या प्रश्नपत्रिका बदलण्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा प्रसंग टाळण्यात आला. परीक्षा प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ नयेत तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाकडून तत्परतेने कार्यवाही करण्यात आली होती. एम.बी.बी.एस-2019च्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेकरीता राज्यभरातील एकूण 8395 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. सदर परीक्षा केंद्रावर घडलेल्या घटनेबाबत विद्यापीठामार्फत चौकशी करण्यात येत आहे.















Edited By - Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती