प्रकाश आंबेडकरांनी भोसरीमध्ये घेतली कोरोना प्रतिबंधक लस

मंगळवार, 11 मे 2021 (08:16 IST)
सध्या शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण जोरात सुरू आहे. राजकीय पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील दिग्गज नेते पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन लस टोचून घेत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज दुपारी भोसरी येथील रुग्णालयात लस घेतली. प्रकाश आंबेडकर यांची अचानक शहरात एंट्री झाल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र, यावेळी शिवसेनेचे पालिकेतील माजी गटनेते राहूल कलाटे यांची उपस्थिती बोलकी ठरू लागली आहे. 
 
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे जुने भोसरी रुग्णालय येथे प्रकाश आंबेडकर यांनी कोवॅक्सिन लस घेतली. प्रकाश आंबेडकर यांनी लस घेतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्या फोटोत राहूल कलाटे यांची छबी दिसते. खुद्द पक्षाचे राष्ट्रीय नेते भोसरीत आले असताना याठिकाणी वंचितच्या स्थानिक कार्यकर्त्यांची गर्दी होणे आपेक्षित होते. मात्र, वंचितचा एकही कार्यकर्ता उपस्थित नसताना कलाटे यांची उपस्थिती बोलकी ठरली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून कलाटे यांची पक्षात कोंडमारी होत आहे. पालिकेत शिवसेनेची डरकाळी फोडणारे कलाटे यांच्या तक्रारी थेट मातोश्रीवर धडकल्यानंतर त्यांना गटनेते पदावरून पायउतार व्हावे लागले. तेव्हापासून ते पक्षश्रेष्ठींवर कमालीचे नाराज असल्याचे दिसते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती