केवळ निधी अभावी महाराष्ट्रात वीज संकट निर्माण झाले : चंद्रशेखर बावनकुळे

शुक्रवार, 15 एप्रिल 2022 (08:25 IST)
महसूल मंत्रालयाने ऊर्जा विभागाचे तब्ब्ल 18 हजार कोटी प्रलंबित ठेवले आहेत. केवळ निधी अभावी महाराष्ट्रात वीज संकट निर्माण झाले असल्याची घणाघाती टीका राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

स्वतःचे वाद बाजूला ठेऊन महसूल मंत्रालयाने त्वरित 20 हजार कोटी ऊर्जा विभागाला द्यावे अशी मागणी त्यांनी केली. राज्यात निर्माण झालेल्या वीज संकटाबाबत आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, दोन मंत्र्यांच्या वादाचे परिणाम राज्यातील जनता भोगते आहे. निधी अभावी नियोजन गडबडते हे माहिती असताना देखील महसूल मंत्रालयाकडून ऊर्जा विभागाचा 18 हजार कोटींचा निधी थांबविण्यात आला. राज्यात वीज संकट निर्माण होऊ नये यासाठी कोळसाची साठवणूक करण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून देण्यात येत होत्या. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय.
 
राज्यात तीन हजार मेगावॅटचे लोडशेडींग सुरू आहे. वीज बचतीचा संदेश देणे चुकीचे असल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. उलट वीज वापरल्याने राज्य पुढे जाते, ऊर्जाच्या चुकीच्या नियोजनामुळे हे राज्य अधोगतीला जाते आहे. एकीकडे राज्यातील गरीब शेतकऱ्यांची 500 रुपयांसाठी वीज कापली जाते. दुसरीकडे मात्र 18 हजार कोटींचा महसूल अडवला जातो. हे धोरण चुकीचे असल्याचे मत आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती