मुसळधार पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

शुक्रवार, 25 जून 2021 (17:16 IST)
येत्या 24 तासांत पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, पूर्व आणि दक्षिण मध्य प्रदेश, विदर्भ, कोकण आणि गोवा आणि ईशान्य भारतातील काही भागात वेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच पुढील आणखी आठ दिवस राज्यात पावसाची फार कमी शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
 
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्लाही हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांकडून देण्यात आला आहे तर मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि विदर्भात हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह पश्चिम किनारपट्टीवर आज मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे.
 
विदर्भातही काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे तर बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत पुढील काही तासांत विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विनाकारण पावसात बाहेर पडणे टाळावे तसेच मोठ्या झाड्याच्या आडोशाला उभं राहू नये, असा सल्ला देण्यात येत आहे.
 
पश्चिम बंगाल, छत्तीसगड, ओडिशाचा काही भाग, मराठवाडा आणि तेलंगणामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोस्टल कर्नाटक, दक्षिण-पूर्व राजस्थान, दक्षिण गुजरात, केरळचा काही भाग, अंतर्गत कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर-पश्चिम आणि उत्तर पूर्व  राजस्थान, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागांत धुळीच्या वादळासह पाऊस पडेल. पश्‍चिम हिमालयावर एक किंवा दोन ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो.
 
गेल्या 24  तासात कोकण आणि गोवा, दक्षिण मध्य प्रदेश, झारखंड आणि अरुणाचल प्रदेशात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती