राजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत होते : बाळासाहेब थोरात

मंगळवार, 30 मार्च 2021 (16:13 IST)
“युपीएचं नेतृत्व सोनिया गांधीच करणार आहेत. शेवटी काँग्रेस हा देशव्यापी पक्ष आहे. कदाचित अडचणीच्या काळातून जात असेल, मात्र देशाचं नेतृत्व काँग्रेसकडे आहे आणि त्यांच्याकडेच राहणार आहे. अवघड दिवस निघून जातील आणि पुन्हा काँग्रेसेच दिवस येतील. त्यामुळे अशी कल्पना मांडणं मला योग्य वाटत नाही,” असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
 
“संजय राऊत हे एका बाजूला राजकारणी आहेत. आघाडी सरकार होण्यात त्यांचा मोठा सहभाग असल्याचं आम्ही जाहीरपणे सांगत असतो. पण ते संपादकही आहेत. कदाचित राजकारणी आणि संपादक यामध्ये त्यांची गल्लत होते का काय असं वाटून जातं. तीन पक्ष एकत्र असताना आणि चांगलं काम करत असताना त्यांना बळ देणं त्यांचं काम आहे. असं वक्तव्य करुन मनात दोष निर्माण होतो हे त्यांनी करु नये,” असं स्पष्ट मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे.
 
“अशा वक्तव्यामुळे नाराजी होत असते. जेव्हा आघाडीचे प्रमुख एकत्र येतो तेव्हा यावर साहजिकच चर्चा होते. आघाडीचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे, आम्ही घटकपक्ष आहोत. सर्वांची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. सोनिया गांधी आणि शरद पवारांमध्ये चांगले संबंध असून असं वक्तव्य करुन भेद निर्माण करण्याची काही गरज नाही,” असंही ते म्हणाले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती