राज्यातील सर्व शाळा संपूर्ण क्षमतेसह सुरू करण्यास राज्य सरकारची परवानगी

गुरूवार, 24 मार्च 2022 (22:30 IST)
राज्यातील सर्व शाळा 100 टक्के उपस्थितीसह पूर्णवेळ सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. शिवाय, एखाद्या शाळेला रविवारी शाळा भरवायची असेल, तर त्यासाठीही परवानगी देण्यात आली आहे.
 
कोरोनाच्या प्रादूर्भावानंतर पहिल्यांदाच शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
 
यासंदर्भात राज्य सरकारने एक शासननिर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार,
 
पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग पूर्णवेळ घेऊ शकता, उपस्थिती 100 टक्के
रविवारी ऐच्छिक स्वरुपात शाळा सुरू ठेवण्यासही परवानगी
पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात आणि निकाल मे महिन्यात जाहीर करावा
स्थानिक प्रशासनाला दिलेले अधिकार अबाधित राहतील
अशा सूचना राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत.
 
जग पूर्वपदावर येत असताना चीनमध्ये लॉकडाऊन
कोरोनासंसर्गाचं महामारीचं संकट ओसरून जग पूर्वपदावर येत असतानाच नवीन व्हेरियंट 'डेल्टाक्रॉन' काही देशात आढळून आलाय. चीनमध्येही जिलीन आणि शेंझेन प्रांतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन लावण्यात आलाय.
 
'डेल्टाक्रॉन' सध्या काळजीचं कारण वाटत नसला तरी, तो डेल्टा आणि ओमिक्रॉनचं कॉम्बिनेशन आहे. डेल्टामुळे व्हेरियंट जीवघेणा तर, ओमिक्रॉनमुळे तो तीव्र वेगाने पसरणारा आणि संसर्ग करणारा ठरत आहे.
 
चीनमध्ये कोरोनारुग्णांची संख्या वाढल्यामुळे काही शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलाय. जिलीन आणि शेंझेन प्रांतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन लावण्यात आलाय. टोयोटा, फॉक्सवॅगन आणि अॅपलला पुरवठा करणाऱ्या फॉक्सकॉनसारख्या कंपन्यांना या लॉकडाऊनचा फटका बसलाय. मंगळवारी (15 मार्च) चीनमध्ये 5000 हजारांपेक्षा जास्त केसेस नोंदवल्या गेल्या. यामधल्या बहुतेक केसेस जिलिन प्रांतात होत्या.
 
चीनच्या ईशान्येला असणाऱ्या या प्रांतात लॉकडाऊन लावण्यात आलाय आणि इथले 2.4 कोटी नागरिक सध्या क्वारंटाईन आहेत. कोरोनाच्या साथीच्या सुरुवातीच्या काळात चीनने वुहान आणि हुबेई प्रांतात लावलेल्या लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच अशाप्रकारे एखाद्या संपूर्ण प्रांतावर लॉकडाऊन लावण्यात आलाय.
 
जिलिन प्रांतातल्या रहिवाशांना घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. आणि त्यांना प्रांताबाहेर जायचं असेल तर त्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल. यासोबतच शेंजेंन प्रांतातही 5 दिवसांसाठी लॉकडाऊन लावण्यात आला होता.
 
एकीकडे कोरोनाचं नवीन म्युटेशन आणि दुसरीकडे चीनमधील वाढती रुग्णसंख्या याचा भारताला काही धोका आहे का? Deltacron' व्हेरियंट काय आहे? याबाबत आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
डेल्टाक्रॉन काय आहे?
कोरोनाव्हायरसचा नवीन व्हेरियंट 'डेल्टाक्रॉन' हा डेल्टा (AY.4) आणि ओमिक्रॉन (BA.1) या व्हेरियंटचं कॉम्बिनेशन आहे.
 
युरोपातील फ्रान्स, नेदरलॅंड्स, यूके आणि डेन्मार्क या देशांमध्ये 'डेल्टाक्रॉन' व्हेरियंटने बाधित रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारी महिन्याच्या सुरूवातीला हा व्हेरियंट पहिल्यांदा आढळून आला होता.
 
जागतिक आरोग्य संघटनादेखील 'डेल्टाक्रॉन' व्हेरियंटवर लक्ष ठेऊन आहे. या नवीन व्हेरियंटबद्दल पत्रकार परिषदेत माहिती देताना जागतिक आरोग्य संघटनेच्या टेक्निकल हेड डॉ. मारिया वॅन-कारकोव्ह म्हणाल्या, "डेल्टाक्रॉन, डेल्टा आणि ओमिक्रॉनचं कॉम्बिनेशन आहे. काही देशात हा नवीन व्हेरियंट आढळून आला असला तरी, याचे रुग्ण अत्यंत कमी आहेत."
 
भारतात कोरोनासंसर्गाची दुसरी लाट फेब्रुवारी 2021 मध्ये डेल्टा व्हेरियंटमुळे पसरली होती. देशात हाहा:कार माजला होता. डेल्टा व्हेरियंट अत्यंत तीव्र गतीने पसरला. यामुळे होणारा आजारही खूप गंभीर स्वरूपाचा होता. डेल्टाच्या लाटेत हजारो लोकांचे बळी गेले.
 
तर, गेल्यावर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस मुंबई आणि दिल्लीसारख्या महानगरांमध्ये ओमिक्रॉनची लाट आली. कोरोनासंसर्गाच्या तिसऱ्या लाटेत पहाता-पहाता मुंबईत रूग्णांची संख्या 20 हजारपार पोहोचली. पण, ओमिक्रॉन, डेल्टासारखा घातक नव्हता. अत्यंत संसर्गजन्य आणि तीव्र गतीने पसरणारा असला. तरी यामुळे होणाऱ्या आजाराची तीव्रता कमी होती. ओमिक्रॉनची लाट ज्या झपाट्याने पसरली त्याच वेगाने परिस्थिती नियंत्रणात आली.
 
डेल्टाक्रॉन व्हेरियंट यूकेमध्येही आढळून आलाय. बीबीसी न्यूजच्या ब्रेकफास्ट कार्यक्रमात यूकेचे आरोग्य मंत्री साजिद जावेद म्हणाले, "यूकेमध्ये हातांच्या बोटावर मोजण्या इतके रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे याकडे धोका म्हणून पाहण्याची गरज नाही." आम्ही यावर दररोज अभ्यास करतोय. पण, उपलब्ध डेटानुसार सद्यस्थितीत काळजी करण्याचं कारण नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती