रुग्णालयात रुग्ण वाऱ्यावर, कुठे दारू पार्टी तर कुठे चित्रपटाचे शुटिंग

शुक्रवार, 29 एप्रिल 2022 (21:56 IST)
नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात रुग्णांना वाऱ्यावर सोडून कर्मचारी चक्क दारु पार्टी करत असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे रुग्णालयात रुग्ण दाखल असतानाही चक्क चित्रपटाच्या शुटिंगसाठी परवानगी देण्यात आली होती. या धक्कादायक प्रकारचे फोटोही समोर आले आहेत. तर सी.सी.टीव्ही तपासून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी दिल्याचे मनपा वैद्यकीय अधीक्षक यांनी सांगितलं आहे.
 
सदरच्या रुग्णालयात गेल्या दोन दिवसांपासून रात्री पासून तर पहाटे पर्यंत ‘द इंवेस्टीगेशन’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते.  रात्रीच्या वेळी कर्मचारी रुग्णांना वाऱ्यावर सोडून इमर्जन्सी वॉर्डमध्ये दारू पीत बसले होते. रात्री अकरा ते चारपर्यंत चालणाऱ्या या शूटिंगमुळे रुग्णांना आवाजाचा आणि गोंधळाचा प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. एका बाजूला चित्रपट शूटिंगचा गोंधळ तर दुसऱ्या बाजूला दारू पार्टी करत कर्मचाऱ्यांनी आरोग्य व्यवस्थेचा खेळखंडोबा झाल्याचे  समोर आले  आहे.
 
विशेष म्हणजे वर्षभरापुर्वी याच ऑक्सिजनची गळती दुर्घटनेत 22 पेक्षा जास्त रुग्ण दगावले होते. त्यामुळे राज्यासह देशात या रूग्णालयाची बदनामी झाली होती. या घटनेवर अजुनही चर्चा होत आसताना पुन्हा येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती