कायद्यानुसार पक्षप्रमुखाने गटनेता नेमायचा असतो. मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अजय चौधरी यांना गटनेता म्हणून घोषित केले. तशा प्रकारचे पत्र आमच्याकडे आले आहे. तसेच प्रतोद नेमण्याची जबाबदारी गटनेत्याकडे असते. एकनाथ शिंदे यांच्याकडून आलेले पत्र मी पाहिलेले नाही, ते पाहून त्यावर विचार करुन प्रतोद कोण आणि गटनेता कोण याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे विधानसभेचे उपाध्यक्ष तथा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.
झिरवाळ म्हणले, नितीन देशमुख यांनी सांगितले आहे की माझी सही इंग्रजीत आहे आणि पत्रावरील सही मराठीत आहे. त्यामुळे माझी सही ग्राह्य धरु नये. त्यामुळे मी ते तपासून घेणार आहे. त्यानंतर निर्णय घेऊ, असे झिरवाळ म्हणाले. तसेच एकनाथ शिंदे यांच्याकडून गटनेता म्हणून जे पत्र देण्यात आलेले आहे, यामध्ये अपक्ष आमदारांच्याही सह्या आहेत. तसेच नितीन देशमुख यांच्या आक्षेपामुळे पत्रावर शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे मी पडताळणी करणार असून सर्व बाबी तपासल्यानंतरच निर्णय देणार असल्याचेही झिरवाळ म्हणाले.