पालघर, पुणे शहर, गडचिरोलीला पुढचे २ दिवस अतिवृष्टीचा इशारा

बुधवार, 13 जुलै 2022 (15:18 IST)
मुंबईसह ठाणे, पालघर आणि आसपासच्या शहरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. पावसाची संततधार कायम असल्यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
 
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालघर, पुणे शहर, गडचिरोली या ठिकाणी पुढचे २ दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आहे. तसेच, पावसाचा जोर कायम असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय, अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, अशी सूचना प्रशासनाने दिली आहे.
 
मुंबई, ठाणे आणि रायगड आणि पालघरच्या काही भागात पुढील २.३ तास मध्यम तीव्रतेचा पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय, पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ३० टक्के क्षेत्रावर पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यात भातशेती आणि बाकी पिकांचा समावेश आहे. पुढचे दोन दिवस शहराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे शहर आणि धरण क्षेत्राच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरणात  क्षमतेच्या १०० टक्के पाणीसाठा झाला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती