नाशिकच्या झाकिर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याने 22 रुग्णांचा मृत्यू झालाय. अशी माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांधरे यांनी दिली. दरम्यान या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती मनपा आयुक्तांनी दिली आहे. दरम्यान अजून काही रुग्ण गमावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णालयातील काही रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्सिजनचं प्रेशर कमी झाल्यामुळे २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची आत्तापर्यंतची आकडेवारी हाती आली आहे. याविषयी महापालिका आयुक्त आणि पालिकेच्या इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकेल. यासंदर्भात सरकारला देखील माहिती कळवण्यात आली आहे, अशी माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
हा तांत्रिक विषय आहे. एका ठिकाणहून लीक झालं, त्यामुळे प्रेशर कमी झालं आणि अपघात झाला. आता वेल्डिंग करत आहोत. हा प्रॉब्लेम लवकरच सुटेल. मी डॉक्टर आहे, मला तांत्रिक गोष्टी कळत नाही, अशी प्रतिक्रिया झाकिर हुसैन रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी नितीन राऊते यांनी दिली.