अन्यथा स्वबळाची परिपुर्ण तयारी; भुजबळांचा सेना, काँग्रेसला इशारा

शनिवार, 5 फेब्रुवारी 2022 (08:15 IST)
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना जाहीर झाल्या असून लवकरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीस सुरवात केली आहे. त्यानुसार सर्वांची मते जाणून घेण्यात येत असून सन्मानपूर्वक आघाडीस प्राधान्य देण्यात आहे. मात्र आघाडी न झाल्यास स्वबळावर सर्व जागा लढण्याची देखील तयारी करण्यात येत असे सांगत देशभरात भाजपची हवा आता ओसरली असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
 
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी पार्टीच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत राष्ट्रवादी भवन नाशिक येथील कार्यालयात आढावा बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, लवकरच महानगरपालिका जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य निवडणुका होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आढावा घेण्यात येत आहे. आगामी निवडणुका लढताना भाजप वगळता समविचारी पक्ष व गटांशी आघाडी करण्यास आमचे प्राधान्य असणार आहे. मात्र सन्मानपूर्वक आघाडी न झाल्यास संपूर्ण जागांवर निवडणुका लढण्याची तयारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात येत असून प्रभागरचनेचा सूक्ष्म अभ्यास करून नागरिकांची मते जाणून घेतली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
 
ते म्हणाले की, आपल्या कामकाजामुळे भाजपची हवा देशपातळीवरच कमी झालेली आहे. तसेच नाशिक महानगरपालिकेत भाजपच्या कामकाजामुळे नागरिकांमध्ये देखील जागृती असून शहरात देखील पूर्वीसारखी लाट राहिलेली नाही. आगामी महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला नागरिकांची पसंती असून पक्षाची शहरात ताकद देखील अधिक वाढली आहे. त्यानुसार निवडणुकीची तयारी करण्यात येत असून अधिक गतीने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.
 
मंत्री छगन भुजबळ यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या आढावा बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. यावेळी विभागानुसार नेमण्यात आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. प्रभाग रचना जाहीर झाली असून त्याचा सूक्ष्म अभ्यास करून माहिती गोळा करण्यात यावी. आघाडी होवो ना होवो संपूर्ण जागांवर निवडणुका लढण्याची तयारी करावी. विभागवार जबाबदारी घेऊन निवडणुकीचे कामकाज करण्यात यावे. पक्ष अतिशय मजबुतीने उभा असून पदाधिकाऱ्यांनी ताकदीने कामाला सुरुवात करावी अशा सूचना त्यांनी यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती