नंदुरबार आणि शहादा शहरात कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात असल्याने महसूल, पोलीस, आरोग्य आणि नगरपालिका यांचे एकत्रित पथक तयार करून विवाह सोहळ्याच्या ठिकाणी भेट द्यावी आणि 50 पेक्षा अधिक नागरिक दिसून आल्यास कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते.
डॉ.भारुड म्हणाले, विवाह सोहळ्यात अधिक संख्येने नागरिक आढळल्यास कारवाई करून मंगल कार्यालय बंद करण्यात यावे. मंगल कार्यालयाबाहेर कोरोना विषयक सुचनांचा फलक लावण्यास सांगावे. कोरोना बाधित व्यक्तींचे शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात अलगीकरण होईल याची खात्री करावी.
कोरोना बाधित आढळत असलेल्या भागात शिबीर आयोजित करून स्वॅब संकलन करावे. दुकान आणि बाजारात मास्क न घालणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात यावी. अशाच स्वरुपाची कारवाई करण्यासाठी बस आणि रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी बैठेपथक नियुक्त करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.
पंडीत म्हणाले, मंगल कार्यालय चालकांची बैठक घेण्यात आली असून त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मंगल कार्यालयात नियमांचे पालन न झाल्यास ते सील करण्यात यावे. व्यावसायिकांनी देखील नियमांचे पालन न केल्यास त्याच्यावर देखील पोलीसांमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी मास्कचा वापर न केल्यास अधिक कठोर कारवाई करण्यात येईल.